Join us  

केकेआरविरुद्ध आरसीबीला आज अखेरची संधी

रॉयल चॅलेंसर्ज बँगलोरला (आरसीबी) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (केकेआर) शुक्रवारी आयपीएलमध्ये स्थान टिकविण्यासाठी ‘करा किंवा मरा’ या निर्धारासह खेळावे लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 4:23 AM

Open in App

कोलकाता : आठपैकी सात सामने गमविणाऱ्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंसर्ज बँगलोरला (आरसीबी) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (केकेआर) शुक्रवारी आयपीएलमध्ये स्थान टिकविण्यासाठी ‘करा किंवा मरा’ या निर्धारासह खेळावे लागणार आहे.सलग तीन सामने गमविल्यानंतर केकेआर दुस-यावरून सहाव्या स्थानी घसरला. त्यामुळेच आरसीबीकडे विजय नोंदविण्याची संधी असेल. केकेआरचा हुकमी एक्का आंद्रे रसेल हा खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्याआधी चेन्नईविरुद्धदेखील तो पूर्णपणे फिट नव्हता. तो आरसीबीविरुद्ध खेळतो का, हे पाहावे लागेल. त्याच्या अनुपस्थितीत केकेआरच्या मर्यादा उघड होऊ शकतात. प्ले ऑफसाठी केकेआरला सहापैकी किमान चार सामने जिंकणे गरजेचे आहे. त्यापैकी तीन सामने ईडन गार्डनवर खेळले जातील.आरसीबीचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी चांगली कामगिरी केली आहे, पण सांघिक कामगिरीत संघ अपयशी ठरला. वेगवान गोलंदाजांनीही निराश केले. युवा नवदीप सैनी याची कामगिरी चांगली झाली तर अनुभवी उमेश यादव फ्लॉप ठरला. नॅथन कूल्टर-नाईल जखमी असल्याने डेल स्टेन संघात आला आहे.केकेआर संघाची गोलंदाजीदेखील साधारण अशीच राहिली. फलंदाजीला उपयुक्त असलेल्या इडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर फिरकीपटूदेखील चमक दाखवू शकले नव्हते. त्याचप्रमाणे सामन्यानिमित्त सर्वांची नजर असेल ती केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकवर. त्याला रिषभ पंतऐवजी विश्वचषकासाठी पसंती देण्यात आली असल्याने आता तो कसा खेळ करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कार्तिकने यंदाच्या सत्रात १८.५० च्या सरासरीने धावा केल्या असून, त्यात केवळ एकच अर्धशतक आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :आयपीएल 2019कोलकाता नाईट रायडर्स