ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी दीपक चहरने ( Deepak Chahar) घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने वैद्यकीय इमर्जन्सीमुळे चहर घऱी गेल्याचे सांगितले होते. त्याच्या घरी जाण्यामागचं कारण समोर आलं आहे. दीपक चहरच्या वडिलांना अचानक ब्रेन स्ट्रोक आल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. अलिगडमध्ये एका लग्न समारंभात चहरच्या वडिलांना अचानक ब्रेन स्ट्रोक आला.हे कळताच दीपक चहर घाईघाईने ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका सोडून घरी परतला. आता दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणे त्याच्यासाठी कठीण झाले आहे. दीपक चहर दुखापतीतून बरा झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी परतला होता, त्यामुळे त्याच्या वडिलांसोबतचा हा अपघात त्याला क्रिकेटपासून आणखी दूर करू शकतो. दीपक चहरचे वडील लोकेंद्र सिंह यांनी दीपकला चांगला क्रिकेटर बनवण्यासाठी नोकरी सोडली.
दीपक चहरने मिथराज हॉस्पिटलबाहेर पत्रकारांना सांगितले की, त्याने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवडकर्त्यांना कळवले आहे की वडील बरे होईपर्यंत त्याला इथेच राहायचे आहे. सुरुवातीला लोकेंद्र सिंग यांना दिल्लीतील रुग्णालयात हलवण्याचा विचार कुटुंबीय करत होते, पण ते शक्य झाले नाही.
आम्ही त्यांना वेळेवर रुग्णालयात नेले, अन्यथा ते धोकादायक ठरू शकले असते. त्यांची प्रकृती सध्या चांगली आहे. मी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा शेवटचा ट्वेंटी-२० सामना का खेळला नाही, असे लोक विचारत होते. माझे वडील माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. मी त्यांना या स्थितीत सोडून कोठेही जाऊ शकत नाही. एकदा ते धोक्यातून बाहेर आले की मी माझा दक्षिण आफ्रिकेचा दौरा सुरू करेन. मी राहुल (द्रविड) सर आणि निवडकर्त्यांशी बोललो आहे. सध्या माझ्या वडिलांची प्रकृती चांगली आहे, असे चहरने सांगितले.
दीपक चहर दक्षिण आफ्रिकेच्या वन डे आणि ट्वेंटी-२० संघाचा भाग आहे. या दौऱ्यात भारताला तीन वन डे आणि ३ ट्वेंटी-२० सामने खेळायचे आहेत. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबरला पहिल्या ट्वेंटी-२० सामन्याने होणार आहे. भारतीय संघ काल आफ्रिकेसाठी रवाना झाला.