पाल्लेकल : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला नवा चेंडू किंवा जुन्या कुकाबुरा चेंडूवर डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजीची कुठलीही अडचण नाही. संघाच्या गरजेनुसार मी सज्ज असून, कुठलाही अहंकार नसल्याचे त्याने स्पष्ट केले.पाकिस्तानविरुद्ध आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात शनिवारी बुमराहसोबत नवा चेंडू कोण सांभाळेल हे पाहावे लागेल. शमी म्हणाला, ‘मला नव्या किंवा जुन्या चेंडूने गोलंदाजी करण्यास हरकत नाही. माझ्यात असा कुठलाही अहंकार नाही. मी, बुमराह आणि सिराज तिघेही चांगला मारा करतो. सामन्यात कोणाला खेळवायचे हे संघ व्यवस्थापन ठरवेल. माझ्याकडे चेंडू सोपविण्यात आला की मी गोलंदाजीसाठी तयारच असतो.’
विश्वचषकाआधी बुमराहचे पुनरागमन संघाचे मनोबल वाढविणारे ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत शमी म्हणाला, ‘बुमराह वर्षभर खेळापासून दूर राहिला. त्याचा फटका बसला. आता तो परतल्यामुळे गोलंदाजी भक्कम झाली. आशिया चषकात संघासाठी बुमराह हुकमी एक्का ठरेल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.’