लंडन : पुढील महिन्यात साउदम्पटन येथे होणाऱ्या भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंड संघ सज्ज झाला आहे. ‘या सामन्यासाठी आपण उत्साहित असून, भारताविरुद्ध खेळणे आव्हानात्मक ठरेल’, असे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने सांगितले.
१८ जूनला भारत आणि न्यूझीलंड पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी समोरासमोर येतील. आयसीसीच्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये विलियम्सनने म्हटले की, ‘भारताविरुद्ध खेळणे शानदार आव्हान ठरेल. अंतिम सामना खेळणे रोमांचक अनुभव असतो आणि तो सामना जिंकणे सोन्याहून पिवळे ठरते.’ स्पर्धेबाबत विलियम्सन म्हणाला की, ‘जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील सामने खूप रोमांचक ठरले. भारत-ऑस्ट्रेलिया मालिका असो किंवा आमची पाकिस्तानविरुद्ध झालेली मालिका असो, जबरदस्त अटीतटीची स्पर्धा रंगली.’
यावेळी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वॅगनर याने मान्य केले की, इंग्लंडमधील परिस्थितीचा फायदा घेत योग्य मारा करण्याची भारतीय गोलंदाजांची क्षमता आहे. तो म्हणाला की, ‘भारताकडे शानदार गोलंदाज आहेत. त्यांनी वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. ते चेंडू स्विंग करू शकतात, मात्र ऊन पडल्यानंतर खेळपट्टी सपाटही होऊ शकते. असे झाल्यास त्यांना मदत मिळणार नाही.’ वॅगनर पुढे म्हणाला की, ‘इंग्लंडमधील वातावरण पटकन बदलत राहते. मी जास्त विचार करत नाही.’
अंतिम सामना चांगला अनुभव ठरेल - विहारीसध्या इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेटमध्ये भारताचा फलंदाज हनुमा विहारी चमक दाखवत आहे. तो वार्विकशायर संघाकडून खेळतोय. ‘देशासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणे शानदार अनुभव ठरेल,’ असे मत विहारीने व्यक्त केले. विहारी म्हणाला की, ‘या अंतिम सामन्यासाठी मी खूप उत्साहित आहे. मात्र असे असले तरी भावनेच्या भरात वाहून जाणार नाही. एक खेळाडू म्हणून भारतासाठी खेळणे नेहमीच शानदार अनुभव असतो.’