नवी दिल्ली : आशिया चषक स्पर्धेत विराट कोहलीला संघात का देण्यात आले नव्हते याचा खुलासा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला आहे. विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते आणि त्याने भारताला जेतेपद जिंकून दिले. अंतिम लढतीत भारताने तीन विकेट राखून बांगलादेशवर विजय मिळवताना सातव्यांदा आशिया चषक उंचावला.
शास्त्रींनी गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,''विराटला विश्रांतीची आवश्यकता होती. त्याची शारीरिक तंदुरूस्ती भरपूर आहे आणि त्याला मैदानाबाहे ठेवूच शकत नाही. विराट खेळत असलेल्या सामन्यातील चुरस वेगळ्याच उंचीवर असते. त्यामुळे केवळ मानसिक थकवा जाणवू नये म्हणून त्याला विश्रांती देण्यात आली."
'' काही काळ विराटचे लक्ष क्रिकेटपासून दूर केल्यास तो पुन्हा नव्या दमाने पुनरागमन करण्यास सज्ज होईल. संघातील अन्य खेळाडूंसोबतही असेच केले जाते. जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार यांनाही अशीच विश्रांती दिली जाते. त्यांना तंदुरूस्त करण्यासाठी विश्रांतीची गरज असते.''