काल पासून राहून राहून CID मधील ACP प्रद्युमन यांचा कुछ तो गडबड है, दया! हा डायलॉग सतत मनात घोळतोय... दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका आपण म्हणजे टीम इंडियानं १-० अशा आघाडीवरून १-२ अशी गमावली. खेळात जय-पराजय होत राहतो. पण, या पराभवाच्या २४ तासानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला अन् तो म्हणजे विराट कोहलीचे ( Virat Kohli) तडकाफडकी कसोटी कर्णधारपद सोडणे... काही वृत्तांच्या मते केपटाऊन कसोटीनंतर विराट मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना भेटला आणि कर्णधारपद सोडत असल्याचे सांगितले... विराटनं हा निर्णय आधीच ठरवला होता आणि केवळ औपचारिकता म्हणून तो त्यानं द्रविड यांना सांगितला. त्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांना फोन गेला, त्यांनी विराटचं म्हणणं ऐकलं अन् ओके म्हणून फोन ठेवला... पण , तरीही समोर उभं केलेलं चित्र ते तसंच नसून काहीतरी नक्की शिजतंय किंवा झालंय, हे नक्की...
जरा फ्लॅशबॅकमध्ये जाऊया.... विराट कोहली आणि रवी शास्त्री ही जोडी म्हणजे टीम इंडियासाठी विजयाचं समीकरण बनली होती. त्यांची कार्यपद्धती ही वेगळी होती, परंतु त्यातून भारताला हवा तो रिझल्ट मिळत होता. त्यामुळेच शास्त्री यांनाच मुख्य प्रशिक्षकपदासाठी पुन्हा विचारण्यात आले आणि तेव्हा गुरूजी नाही म्हणाले. त्यानंतर शोधाशोध सुरू झाली आणि शास्त्री गुरूजींच्या विरुद्ध स्वभाव असलेल्या राहुल द्रविडची निवड झाली... विराटच्या या निर्णयामागे द्रविडची निवड आहे का, तर नाही.. विराटला शास्त्री यांचे असण्याची एवढी सवय झाली होती की तेच मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहतील असे त्याला वाटत होते. पण गुरुजींनी गुगली टाकली.. शास्त्रींच्या या निर्णयानंतर विराटला त्याचे पंख छाटल्यासारखे वाटू लागले... त्यानंतर त्यानं ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केले...
एरवी बाहेरील व्यक्तींच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष न देणारा विराट आता बाहेरील चर्चांवर उघडपणे बोलू लागला. दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी झालेली पत्रकार परिषद आठवा... त्यात विराटनं दिलेली बहुतांश उत्तरं ही सोशल मीडियावरील चर्चांना उल्लेखून होती. ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडताना BCCIनं समजावलं का?, वन डे कर्णधारपदावरून काढणार हे सांगितलं होतं का? असे ते प्रश्न. ज्यावर विराटनं उघड व्यक्त होणं, एक खेळाडू व संघाचा कर्णधार म्हणून गरजेचं नव्हतं. तरीही तो झाला. यामागे BCCI vs Virat Kohli हा सामना सुरू असल्याचे संकेत मिळतच होते.
भारतीय संघ जेव्हा जून २०२१ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. तेव्हापासून खरं तर वादाची ठिणगी पेटली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला. तेव्हा विराट प्रचंड चिडला. ५-६ वर्षं टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळूनही एकही आयसीसी स्पर्धा जिंकता न येणं हे विराटच्या कारकीर्दितील मोठं अपयश आहे. त्यामुळेच हातचा घास गेल्यावर विराटची चिडचिड होणे स्वाभाविक होतं. त्यानंतर विराटचे एकूण वागणं बदलत गेले. विराट सराव सत्रानंतर खेळाडूंशी बोलत नाही, त्याच्याशी संपर्क करता येत नाही, अशा बातम्या मग समोर आल्या. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विराटनं आर. अश्विनला बाकावर बसवून ठेवलं. ज्या अश्विननं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नीट उभंही राहता येत नसताना हनुमा विहारीसह ऑसी गोलंदाजांचा मारा शरीरावर झेलून संघाचा पराभव टाळला, त्याला अशी वागणूक दिल्यावर नाराजीचा सूर अधिक तीव्र होत गेला.
भारताच्या काही सीनियर खेळाडूंनी विराटची बीसीसीआयकडे तक्रार केल्याची चर्चा रंगली आणि ती काही अर्थी खरी होती. आर. अश्विनचं नाव समोर येताच त्यानं ही अफवा असल्याचे म्हटले. आयसीसी स्पर्धा जिंकण्याचं प्रेशर विराटवर वाढत होते आणि त्यामुळे तो धडाधड निर्णय घेत गेला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून त्याला बीसीसीआयची बोलती बंद करायची होती, परंतु त्याचा डाव उलटा पडला. स्पर्धेपूर्वीच केलेली कर्णधारपद सोडण्याची घोषणा खेळाडूंचे मनोबल उंचावणारी नव्हे, तर त्यांच्यावर दडपण वाढवणारी ठरली. संघ निवड चुकली, परंतु विराट यावर उघडपणे बोलू शकला नाही. मात्र, कार्यकाळ संपताच शास्त्रींनी तोंड उघडले अन् २०१९च्या वर्ल्ड कपमध्ये कसं त्यांचं मत न विचारात घेता विजय शंकरला निवडलं गेलं, ते त्यांनी उघड सांगितलं.
गुरुजींनी सुरुवात केल्यानंतर विराटही सुटला अन् तो आता बीसीसीआयला थेट अंगावर घेऊ लागला. पण, याचा त्याच्याच कामगिरीवर परिणाम होतोय हे तो विसरला. मागील पाच महिन्यांत विराटनं त्याच्या चाहत्यांना धक्क्यांमागून धक्के दिले आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद, त्यानंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद त्याने सोडले. त्यानंतर वन डे संघाच्या कर्णधारपदावरून त्याला हटवण्यात आले आणि काल त्यानं कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले. त्याच्या या निर्णयामागे त्याचा फॉर्म हाही विषय आहेच. मागील दोन वर्षांत त्याला एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेलं नाही. बीसीसीआय विरुद्ध विराट हा सामना पडद्यामागे सुरू आहे आणि याचा शेवट काय होईल, हे विराटच सांगू शकतो. कारण, तो आता सध्या वेगळ्या फेजमध्ये आहे.
तो बाबा बनलाय आणि आता त्याला मुलीला वेळ द्यावासा वाटतोय... सततचे दौरे हे टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी नवे नाहीत पण, कोरोनामुळे आलेली निर्बंध ही मानसिक कसोटी पाहणारी आहेत. अशात अनेक खेळाडूंनी निवृत्तीही स्वीकारली आहे. त्यामुळे विराटची वाटचालही त्याच दिशेनं सुरू आहे आणि त्यात काही वावगंही नाही. आपल्याला बंद खोलीत एक दिवस ठेवलं की आपण सैरभैर होतो, खेळाडूंनी प्रत्येक दौऱ्यावर किंवा मालिकेआधी किमान ७ दिवस विलगिकरणात रहावे लागले. सारं काही आलीशान असतं, पण बोलायलाच जवळ कुणी नसलं. त्यामुळेही आता विराटला फॅमिली मॅन बनावसं वाटत असावे आणि त्यामुळे तो खांद्यावरील जबाबदारी कमी करू इच्छित असावा.
त्याच्या मनात काय चाललंय हे तोच सांगू शकतो. पण, आपण एवढंच म्हणू शकतो दाल में कुछ तो काला है!