Join us  

...म्हणून 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर अद्याप 'हॉल ऑफ फेम'च्या देव्हाऱ्यापासून दूर 

आयसीसीच्या एका नियमामुळे सचिन तेंडुलकरला 'हॉल ऑफ फेम'चा मान मिळू शकलेला नाही....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 10:50 AM

Open in App

भारताचा माजी क्रिकेटपटू 'द वॉल' राहुल द्रविडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे. भारताचे माजी विक्रमवीर फलंदाज सुनील गावस्कर यांच्या हस्ते त्याला गुरुवारी हा सन्मान प्रदान करण्यात आला. 'हॉल ऑफ फेम'मध्ये स्थान मिळवणारा राहुल द्रविड हा पाचवा भारतीय खेळाडू आहे. याआधी  बिशन सिंह बेदी, सुनील गावस्कर, कपिल देव आणि अनिल कुंबळे यांचा समावेश आहे. पण हा मान अद्याप क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला मिळालेला नाही. त्यामागे एक विशिष्ट कारण आहे.

‘हॉल ऑफ फेम’मध्ये एखाद्या खेळाडूची निवड करण्यासाठी किंवा खेळाडूंचे नामांकन करणाऱ्यामध्ये प्रमुख पत्रकार, पंच, मॅच रेफरी किंवा प्रशासक यांचा सामावेश आहे. ‘हॉल ऑफ फेम’मध्ये सामाविष्ट होण्यासाठी जे नियम आहेत त्यामध्ये सचिन तेंडुलकर फिट बसत नाही. म्हणून आजपर्यंत सचिनला ‘हॉल ऑफ फेम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही. 

काय आहेत नियम - 

- फलंदाजाने क्रिकेटच्या कोणत्याही एका प्रकारात कमीतकमी 8000 धावा आणि 20 शतके असायला हवीत. किंवा त्याची सरासरी 50 पेक्षा जास्त असावी

- गोलंदाज असेल तर क्रिकेटच्या कोणत्याही एका प्रकारात कमीतकमी 200 पेक्षा जास्त विकेट असायला हव्यात. तसेच कसोटीत 50 तर एकदिवसीय सामन्यात 30 ची सरासरी असायला हवी. 

- यष्टिरक्षकांसाठी क्रिकेटच्या कोणत्याही एका प्रकारात 200 पेक्षा जास्त विकेट्स हव्यात. 

- कर्णधाराने जर 25 कसोटीत किंवा 100 वनडेत नेतृत्व करताना किमान एका प्रकारात तरी जिंकण्याची टक्केवारी 50 पेक्षा जास्त हवी.  

- महत्त्वाचे म्हणजे ज्या खेळाडूंचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणार आहे, त्या खेळाडूंनी पाच वर्षांत कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले नसावे. (सचिन तेंडुलकरने नोव्हेंबर 2013मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.)

टॅग्स :सचिन तेंडुलकरराहूल द्रविडसुनील गावसकर