नवी दिल्ली : प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्कारासाठी ‘बीसीसीआय’ने यंदा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावाची शिफारस केली आहे. बीसीसीआयमधील वरिष्ठ अधिका-यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, धोनीच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे.
क्रिकेटमध्ये धोनीने दिलेल्या योगदानाबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. आतापर्यंत भारताला दोन विश्वचषक जिंकून देण्यात धोनीचा महत्त्वाचा वाटा आहे. कसोटी, वन-डे आणि टी-२० या तिन्ही प्रकारांत धोनीने आतापर्यंत केलेल्या धावा, संघउभारणीत त्याचे योगदान या सर्व बाबींचा विचार करता धोनी हाच पद्मभूषण पुरस्कारासाठी योग्य उमेदवार असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाºयांनी वृत्तसंस्थेला सांगितले. यंदाच्या पद्म पुरस्कारासाठी बीसीसीआयने कुणाचीही शिफारस केलेली नाही. (वृत्तसंस्था)
धोनीला याआधी ‘राजीव गांधी खेलरत्न’, ‘अर्जुन’, ‘पद्मश्री’ असे मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. धोनीच्या नावावर केंद्र सरकारकडून शिक्कामोर्तब झाल्यास पद्मभूषण पुरस्कार मिळणारा तो ११वा क्रि केटपटू ठरेल. याआधी सचिन तेंडुलकर, कपिलदेव, सुनील गावसकर, राहुल द्रविड, चंदू बोर्डे, डी. बी. देवधर, कर्नल सी. के. नायडू, लाला अमरनाथ, पतियाळाचे राजा भलिंद्रासिंग आणि विजयनगरचे महाराज विजय आनंद यासारख्या दिग्गज खेळाडूंना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला पद्मभूषण देण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. या पुरस्कारासाठी धोनीत पूर्ण योग्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
बीसीसीआयद्वारे धोनीला पद्मभूषण देण्याची शिफारस करण्याविषयी पत्रकारांनी विचारल्यानंतर काँग्रेस प्रवक्ता राजीव शुक्ला म्हणाले की, ‘धोनी या सन्मानासाठी पूर्णपणे योग्य आहे. त्याने भारतीय क्रिकेटमध्ये अतुलनीय योगदान दिले आहे. त्याने क्रिकेटर आणि कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेटला खूप काही दिले आहे. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. अद्यापही त्याच्यात खूप क्रिकेट बाकी आहे. जर धोनीला पद्मभूषण मिळाले, तर ते त्याच्या पूर्ण योग्येतेनुरूप असेल.’ बीसीसीआयने धोनीला देशातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषणसाठी नामांकित केले आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाºयाने याला काही दिवसांपूर्वी बोर्डाने यावर्षी पद्म पुरस्कारासाठी फक्त धोनीचे नाव पाठवण्यास दुजोरा दिला होता.
>धोनीची कामगिरी...
३६ वर्षीय धोनीने ३०२ वन-डे त ९,७३७ धावा केल्या असून, ९० कसोटी सामन्यांमध्ये धोनीच्या नावावर ४,८७६ धावा जमा आहेत.
याशिवाय, ७८ टी-२० मध्ये धोनीने १,२१२ धावा केल्या आहेत. कसोटी आणि वन-डे क्रि केट मिळून धोनीच्या नावावर १६ शतके आहेत.
नुकतेच धोनीने अर्धशतकांचे शतक पूर्ण केले होते. यष्टिरक्षक म्हणून तिन्ही प्रकारांमध्ये धोनीने ५८४ झेल घेतले आहेत.
धोनीने आतापर्यंत १६३ फलंदाजांना यष्टीचीत केले आहे. वन डेत तो १० हजार धावांच्या उंबरठ्यावर आहे.
Web Title: Recommendation for Mahendra Singh Dhoni's name 'Padma Bhushan', Shukla's support for the proposal
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.