भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका तब्बल ११ वर्षांनी जिंकली आहे. यापूर्वी भारताने २००४ मध्ये कसोटी मालिका जिंकली होती.
विराट कोहली कसोटी कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतर भारतामधील हा पहिलाच मालिका विजय आहे.
दक्षिण आफ्रिकेने ९ वर्षातील १५ दौऱ्यांनंतर परदेश भूमीवर पहिल्यांदाच कसोटी मालिकेत पराभवाची चव चाखली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील ७९ धावा हा भारत भूमीवरील एखाद्या परदेशी संघाच्या धावसंख्येचा निचांक आहे. यापूर्वी नोव्हेंबर १९९० मध्ये श्रीलंकेचा डाव ८२ धावांवर गुंडाळला होता.
आर अश्विनने नागपूर कसोटीत तब्बल १२ विकेट घेतल्या. यापूर्वी भारतातर्फे एकाच कसोटी सामन्यात १२ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळेने असा पराक्रम तीन वेळा केला आहे.
अश्विनने २०१५ मध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट मिळवण्याचा विक्रम रचला आहे. अश्विनने ८ कसोटी सामन्यात ५५ विकेट घेत इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडचा विक्रम मोडित काढला आहे.
३१ कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत आर अश्विनने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अश्विनच्या नावावर १६९ विकेट्स जमा झाल्या आहेत
नागपूर कसोटीत दोन्ही संघातील एकाही खेळाडूच्या नावे अर्धशतकाची नोंद नाही. या कसोटीत सर्वाधिक धावा भारताच्या मुरली विजयच्या नावे आहेत. मुरली विजयने पहिल्या डावात ४० धावा केल्या होत्या. तर धवन अमला ड्युप्लेसी यांच्यानावे प्रतेकी ३९ धावा आहेत.