Join us  

रेकॉर्डब्रेक! या संघाने 40 षटकांत कुटल्या 503 धावा 

अनिश्चिततेचा खेळ मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या मैदानात जुने विक्रम तुटणे आणि नवे विक्रम प्रस्थापित होणे ही नित्याचीच बाब. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून स्थानिक क्लब क्रिकेटपर्यंत विक्रमांचा सिलसिला सुरू असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 2:07 PM

Open in App

नवी दिल्ली -  अनिश्चिततेचा खेळ मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या मैदानात जुने विक्रम तुटणे आणि नवे विक्रम प्रस्थापित होणे ही नित्याचीच बाब. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून स्थानिक क्लब क्रिकेटपर्यंत विक्रमांचा सिलसिला सुरू असतो. मंगळवारी दिल्लीमध्ये क्लब क्रिकेटमध्ये असाच एक विक्रम प्रस्थापित झाला. येथील एडीडीसी लीगमध्ये एका खेळाडूने फटकावलेल्या 256 धावांच्या जोरावर अजमल खाँ क्लबने 40 षटकांमध्ये तब्बल 503 धावा कुटल्या. नंतर प्रतिस्पर्धी सुपरस्टार क्लबला अवध्या 39 धावांत गुंडाळत 464 धावांनी मोठा विजय मिळवला. एडीडीसी लीगमध्ये सुपरस्टार क्लब आणि अजमल खाँ क्लब यांच्यात झालेल्या या लढतीत अजमल खाँ संघाने प्रथम फलंदाजी करताना तुफानी फलंदाजी केली. या संघातील निखिल गौतमने 30 चौकार आणि 12 षटकारांसह नाबाद 256 धावा कुटल्या. तर दिनेश मोरेने 70 चेंडूत 145 धावा फटकावत त्याला सुरेख साथ दिली. या दोघांबरोबरच हृतिक कनौजिया याने 84 धावांची खेळी केली. प्रथम फलंदाजी करण्यास उतरलेल्या अजमल खाँ संघाला पहिला धक्का लवकर बसला. त्यानंतर मात्र निखिल गौतम आणि दिनेश मोरे यांनी मैदानात चौकार षटकारांची आतषबाजी करत धावांचा पाऊस पाडला. या दोघांनीही दुसऱ्या गड्यासाठी 359 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हृतिक कनौजिया यानेही धडाकेबाज फलंदाजी करून संघाला पाचशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. अजमल खाँ क्लबने विजयासाठी दिलेले 504 धावांचे आव्हान प्रतिस्पर्धी सुपरस्टार क्लबला पेलवणारे नव्हतेच. त्यातच त्यांच्या फलंदाजांनी साफ निराशा केली.  सुपरस्टार क्लबचा डाव अवघ्या 9.3 षटकांत केवळ 39 धावांत आटोपला.  अजमल खाँ संघाकडून लेविस कुमारने 11 धावांत 5 बळी टिपले तर राहुल गेहलोतने 28 धावांत 5 बळी घेतले.   

टॅग्स :क्रिकेटभारत