NZ vs BAN 2nd test, Trent Boult: कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशनेन्यूझीलंडच्या जमिनीवर त्यांनाच पराभवाचा अनपेक्षित धक्का दिला. ८ गडी राखून पहिली कसोटी जिंकणाऱ्या बांगलादेशकडून दुसऱ्या कसोटीतही दमदार कामगिरीची अपेक्षा होती. पण न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत पाहुण्यांची चांगलीच दाणादाण उडवून दिली. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दोन्ही दिवसांवर न्यूझीलंडने वर्चस्व राखलं. न्यूझीलंडने आधी फलंदाजी करताना पाचशेहून अधिक धावा कुटल्या अन् बांगलादेशच्या फलंदाजांना मात्र अवघ्या १२६ धावांवर गुंडाळलं.
न्यूझीलंडच्या संघाने पहिल्याच डावात तब्बल ५२१ धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर टॉम लॅथम आणि डेवॉन कॉनवे यांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. त्यानंतर बांगलादेशच्या संघाकडून चाहत्यांना अपेक्षा होत्या, पण त्यांनी साफ निराशा केली. बांगलादेशचे पहिले पाच बळी दोन आकडी धावाही करू शकले नाहीत. शादमान इस्लाम (७), नजीमुल होसेन (४) आणि लिटन दास (८) यांना ट्रेंट बोल्टने तंबूत धाडलं. तर मोहम्मद नईम (०) आणि मोमीनुल हक (०) यांना टीम सौदीनं धावांचं खातंही उघडू दिलं नाही. त्यामुळे बांगलादेशची अवस्था ५ बाद २७ होती.
यासिर अली आणि नुरूल हसन यांनी संघर्षपूर्ण फलंदाजी केली, त्यामुळे संघाने कशीबशी शंभरी गाठली. यासिर ५५ तर हसन ४१ धावांवर बाद झाला. त्यानंतर उर्वरित बळी झटपट घेत बोल्टने बांगलादेशची दाणादाण उडवली. बोल्टने ४३ धावांत ५ बळी टिपले. त्याने ३०० कसोटी विकेट्सचा टप्पाही ओलांडला. त्याच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंडला तब्बल ३९५ धावांची आघाडी मिळाली.
लॅथमचे दमदार अडीचशतक!
सलामीवीर टॉम लॅथमने धडाकेबाज खेळी केली. त्याने ३४ चौकार आणि २ षटकार खेचत २५२ धावांची आतषबाजी केली. डेवॉन कॉनवेनेही १०९ धावांची खेळी केली. तर टॉम ब्लंडेलने नाबाद अर्धशतक (५७) झळकावलं. या दमदार फलंदाजीच्या जोरावरच न्यूझीलंडने पहिला डाव ६ बाद ५२१ धावांवर घोषित केला.