-ललित झांबरे
इंग्लंड आणि आयर्लंड दरम्यानच्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ 85 धावात तर आयर्लंडचा संघ 38 धावात बाद होण्याशिवाय आणखी एक अद्भूत विक्रम घडला. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच हा विक्रम घडलाय आणि त्याहून विशेष कसोटी क्रिकेट सुरू झाल्यापासून तब्बल 122 वर्षे असा विक्रम घडलेला नव्हता. हा विक्रम म्हणजे कसोटी सामन्याच्या चारही डावात एका क्रमांकावर फलंदाजी करणारे शून्यावर बाद झाले.
सध्याचे उदाहरण घ्यायचे झाले तर लॉर्डस कसोटीत सहाव्या क्रमांकाच्या फलंदाजाबाबत हा अविश्वसनीय योगायोग घडून आला. या सामन्यात सहाव्या क्रमांकावर इंग्लंडच्या मोईन अलीने पहिल्या डावात व जॉनी बेयरस्टोने दुसऱ्या डावात तर आयर्लंडच्या जी.सी.विल्सनने दोन्ही डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली. तसेच मोईन अली, जॉनी बेयरस्टो व जी.सी.विल्सन हे तिघेही फलंदाज शून्यावरच बाद झाले.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात याआधी मार्च 1999 मध्ये असे घडले होते. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज दरम्यानचा तो पोर्ट ऑफ स्पेन कसोटी सामना होता. त्यात दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजाबाबत असे घडले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियातर्फे स्ट्युअर्ट मॅक्गीलने दोन्ही डावात आणि वेस्ट इंडिजतर्फे पहिल्या डावात मार्व्हन डिल्लन व दुसऱ्या डावात पी.टी. कॉलिन्सने दहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली. पण हे तिघेही धावांचे खाते खोलू शकले नव्हते. यात विशेष बाब म्हणजे, चारही डावात दहाव्या क्रमांकावरचे हे फलंदाज त्रिफळाबाद झाले होते.