युवा अष्टपैलू हार्दिक पांड्याने आक्रमक शतकी खेळीदरम्यान आज अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यात कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे एका षटकात फटकावल्या गेलेल्या सर्वाधिक धावांच्या विक्रमाचाही समावेश आहे.
पांड्याने भारताच्या डावातील ११६ व्या षटकात मलिंडा पुष्पकुमाराच्या पहिल्या दोन चेंडूंवर चौकार वसूल केले. त्यानंतर पुढच्या तीन चेंडूंवर त्याने षटकार ठोकले. पांड्याने या षटकात एकूण २६ धावा फटकावल्या. भारतातर्फे हा नवा विक्रम आहे. त्याने संदीप पाटील व कपिलदेव यांचा विक्रम मोडला. त्यांनी एका षटकात २४ धावा वसूल केल्या होत्या.
संदीप पाटीलने १९८२ मध्ये मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज बॉब विलिसच्या एका षटकात सहा चौकार लगावले होते, तर कपिलने १९९० मध्ये लॉर्डस् मैदानावर एडी हॅमिंग्सच्या षटकातील अखेरच्या चार चेंडूंवर चार षटकार ठोकले होते.
कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा फटकाविण्याचा विक्रम संयुक्तपणे वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा व आॅस्ट्रेलियाचा जॉर्ज बेली (२८ धावा) यांच्या नावावर आहे. पाकिस्तानचा अष्टपैलू शाहिद आफ्रिदीने एका षटकात २७ धावा फटकावण्याचा पराक्रम केला आहे, तर पांड्यापूर्वी न्यूझीलंडचा क्रेग मॅकमिलन, लारा, आॅस्ट्रेलियाचा मिशेल जॉन्सन व न्यूझीलंडचा ब्रॅन्डन मॅक्युलम यांनी एका षटकात २६ धावा वसूल केल्या आहेत.
पांड्याने सलग तीन चेंडूंवर षटकार लगावले. कसोटी क्रिकेटमध्ये सलग तीन षटकार ठोकणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कपिलदेव व महेंद्रसिंह धोनी यांनी अशी कामगिरी केली आहे. कपिलने हॅमिंग्सच्या गोलंदाजीवर सलग चार षटकार लगावले होते, तर धोनीने २००६ मध्ये अँटिग्वामध्ये डेव्ह मोहम्मदच्या गोलंदाजीवर तीन षटकार ठोकले होते.
पांड्याने शतकी खेळीत एकूण सात षटकार लगावले. पांड्याने आजच्या खेळीदरम्यान भारतातर्फे एका डावात सर्वाधिक षटकार ठोकणाºया फलंदाजांमध्ये वीरेंद्र सेहवाग व हरभजन सिंग यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. भारतीय विक्रम नवज्योतसिंग सिद्धूच्या नावावर आहे. सिद्धूने १९९४ मध्ये लखनौमध्ये श्रीलंकेविरुद्ध ८ षटकार लगावले होते.
पांड्याने या मालिकेत १० षटकार ठोकले आहेत. एका मालिकेत
सर्वाधिक षटकार ठोकणाºया फलंदाजांमध्ये हरभजन (१४ षटकार, न्यूझीलंडविरुद्ध २०१०) आणि सिद्धू
(११ षटकार, श्रीलंकाविरुद्ध १९९३-९४) यांच्यानंतर पांड्या तिसºया क्रमांकावर आहे.
पांड्याने १०८ धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटच नाही, तर प्रथमश्रेणी क्रिकेटमधील त्याने प्रथमच शतक झळकावले. प्रथमश्रेणी सामन्यात
पहिले शतक कसोटी सामन्यात झळकावणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विजय मांजरेकर, कपिलदेव, अजय रात्रा व हरभजन सिंग यांनी अशी कामगिरी
केली आहे.
पांड्याने केवळ ८६ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. विदेशात भारतातर्फे दुसरे सर्वात जलद शतक ठरले. वेगवान शतकाचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. त्याने २००६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ग्रास आइलेटमध्ये ७८ चेंडूंमध्ये शतक झळकावले होते. पांड्याने दुसºया दिवशी उपाहारापूर्वी १०८ धावा फटकावल्या. तो सामन्यात दिवसाच्या पहिल्या सत्रात सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज ठरला आहे. सेहवागने ग्रास आइलेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २००६ मध्ये उपाहारापूर्वी ९९ धावा केल्या होत्या.
Web Title: Record of Kapil and Patil by Pandita mode
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.