लंडन : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सलामीवीर अॅलिस्टर कुकने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात फॉर्म आणि फिटनेस या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. या दोन्हीपैकी एखाद्या गोष्टीने जरी तुमचा साथ सोडला तर तुमची कारकिर्द संपुष्टात येऊ शकते. पण कुकने या दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाप दाखवत सलग १५४ कसोटी सामने खेळण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बोर्डर यांच्या नावावर होता. बोर्डर यांनी १९७९ ते १९९४ या कालावधीमध्ये सलग १५३ कसोटी सामने खेळले होते.
भारताविरुद्ध १ ते ५ मार्च २००६ या कालावधीमध्ये नागपूर येथे झालेल्या कसोटी सामन्यात कुकने पदार्पण केले होते. या सामन्यात कुकने शतक झळकावले होते. पण त्यानंतर आजारी पडल्यामुळे कुकला दुसरा सामना खेळता आला नाही. पण यानंतर मात्र कुकने सलग १५४ कसोटी सामने खेळले आहेत.
कुकच्या नावावर सध्या १५५ कसोटी सामने आहेत. या १५५ सामन्यांमध्ये ३२ शतकांच्या मदतीने कुकने १२,०९९ धावा केल्या आहेत. बोर्डर यांनी जेव्हा आपला १५३वा सामना खेळला होता, तेव्हा ते ३८ वर्षांचे होते. पण आता सलग १५४वा सामना खेळताना कुक ३३ वर्षांचा आहे. सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणाऱ्यांच्या यादीत कुक आणि बोर्डर यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा मार्क वॉ (107), भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर (106) आणि न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलम (101) यांचा समावेश आहे.