डरबन - दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज जेपी डयुमिनीने स्थनिक क्रिकेट स्पर्धेत खेळताना एकाच षटकात 37 धावा फटकावल्या. केप कोबराजच्या संघाकडून खेळताना डयुमिनीने नाइट्स संघाविरोधात ही कामगिरी केली. 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केप कोबराज संखघाच्या 35 षटकात दोन बाद 208 धावा झाल्या होत्या. डयुमिनी 30 चेंडूत 34 धावांवर खेळत होता.
त्यानंतर 36 व्या षटकात लेग स्पिनर एडी ली गोलंदाजी करण्यासाठी आला. कोबराजच्या संघाने बोनस अंकासह सामना जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. डयुमिनीने पहिल्या चेंडूवर शानदार षटकार खेचला. त्यानंतर पुढच्या तीन चेंडूंवर त्याने तीन षटकार खेचले. दक्षिण आफ्रिकेचा हा फलंदाज एकाच षटकात सहा षटकार ठोकण्याचा विक्रम करणार असे वाटत होते. पण पाचव्या चेंडूवर दोन धावा निघाल्या.
ली च्या या षटकात पाच चेंडूत 26 धावा झाल्या होत्या. त्यानंतर षटकातील शेवटच्या सहाव्या चेंडूवर डयुमिनीने चौकार ठोकला. पण हा चेंडू नो बॉल होता. त्यामुळे पाच चेंडूत 31 धावा झाल्या होत्या. पुन्हा अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून डयुमिनीने एकाच षटकात 37 धावा फटकावण्याच्या कामगिरीची आपल्या नावावर नोंद केली. डयुमिनीच्या या कामगिरीमुळे कोबराजने हा सामना सहज जिंकला. एकाच षटकात सर्वाधिक धावा फटकावणा-या खेळाडूंच्या यादीत डयुमिनी दुस-या स्थानावर आहे. त्याने 37 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. या खेळीत दोन चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता.
झिम्बाब्वेच्या एल्टन चिगमबुराच्या नावावर लिस्ट ए च्या सामन्यात एकाच षटकात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम आहे. 2013 साली ढाका प्रीमियर लीगमध्ये अलाउद्दीन बाबूच्या एका षटकात एल्टन चिगमबुराने 39 धावा फटकावल्या होत्या.