दुबई - सध्याच्या मोजक्या दर्जेदार फलंदाजांमध्ये विराट कोहलीचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटपासून ते वनडे,टी-२० पर्यंत क्रिकेटच्या सर्वच प्रकारात विराटने आपल्या फलंदाजीची छाप पाडली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत २३ हजारांहून अधिक धावा जमवल्या आहेत. त्याशिवाय विराट कोहलीच्या नावावर ७० शतके आहेत. तसेच त्याची सरासरीही ५५ हून अधिक आहे. १३ वर्षांच्या कारकिर्दीत विराट कोहलीने अनेक मोठे विक्रम नोंदवले आहेत. मात्र अनेकदा त्याने सचिन तेंडुलकरपासून डॉन ब्रॅडमनपर्यंत अनेकांच्या विक्रमांना आव्हान दिले आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा एक विक्रम आहे ज्याच्यासाठी विराट कोहलीला गेल्या ११ वर्षांपासून वाट पाहावी लागत आहे.
सन २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यापासून विराट कोहलीने आतापर्यंत ९० सामने खेळले आहेत. यादरम्यान, त्याने ३१५९ धावा जमवल्या आहेत. मात्र एवढ्या धावा फटकावल्यानंतरही विराट कोहलीला आतापर्यंत एकही शतक फटकावता आलेले नाही. अशा परिस्थितीत यावेळी तरी विराट कोहली शतकाला गवसणी घालेल अशी क्रिकेटप्रेमींना अपेक्षा आहे.
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एकही शतक फटकावले नसले तरी सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम विराटच्याच नावावर आहे. त्याने आतापर्यंत २८ वेळा ५० हून अधिक धावा फटकावल्या आहेत. या यादीमध्ये रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एकूण २२ अर्धशतके फटकावली आहेत.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारीवर नजर टाकल्यास विराट कोहलीला तीन वेळा शतकाने हुलकावणी दिली आहे. जानेवारी २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात विराट कोहली ९० धावांवर नाबाद राहिला होता. तर त्याच वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली ८९ धावांवर नाबाद राहिला होता. त्यानंतर २०१९ च्या डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा शतकाने विराट कोहलीला हुलकावणी दिली. त्यावेळी तो ९४ धावांवर नाबाद राहिला.
मात्र टी-२० क्रिकेटच्या एकूण विक्रमांचा विचार केल्यास विराट कोहलीने या प्रकारात आथापर्यंत एकूण ५ शकते ठोकली आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये त्याला असा कारनामा करता आलेला नाही. आता या रेकॉर्डची भरपाई करण्याचा विराटचा प्रयत्न असेल.