मुंबई : भारत आणि पाकिस्तान या शेजाऱ्यांमधील राजकीय संबंध सुधारण्याची चिन्हे नाहीच, त्यामुळे उभय देशांमध्ये गेली कित्तेक वर्ष क्रिकेट मालिका झालेल्या नाही. पाकिस्तानविरुद्ध न खेळून भारतीय संघाला आतापर्यंत फार आर्थिक फटका बसलेला नाही, परंतु यापुढे तसे केल्यास भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावे लागण्याची चिन्हे आहेत. आयसीसी महिला वर्ल्ड चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे आणि त्याचा फटका त्यांना 2021 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत बसू शकतो. भारतीय महिला संघाला वर्ल्ड कपमध्ये थेट पात्रता मिळवणे अवघड होऊ शकते.
पाकिस्तानच्या महिला संघाने वेस्ट इंडिजला नमवून गुणतालिकेत क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतली. भारत आणि पाकिस्तान यांच्या खात्यात प्रत्येकी 12 गुण झाले आहेत, परंतु नेट रनरेटमुळे भारतीय महिला तिसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळे भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यास त्यांना सहा गुणांचा फटका बसू शकतो आणि पाकिस्तानला आघाडी घेण्याची संधी मिळू शकते.
2021 वर्ल्ड कप स्पर्धा न्यूझीलंडमध्ये होणार आहे आणि महिला चॅम्पियन्सशीप गुणतालिकेतील अव्वल चार संघ या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार आहेत. या चार संघांत यजमान न्यूझीलंडचा समावेश असल्यास पाचव्या स्थानावरील संघाला थेट पात्रतेची संधी मिळेल. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहेत आणि उर्वरित चार संघांना पात्रता फेरीतून आगेकूच करावी लागणार आहे.
आयसीसी महिला चॅम्पियन्सशीप स्पर्धा आठ संघांमध्ये खेळवली जात आहे. आयसीसी क्रमवारीनुसार अव्वल आठ संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. हे प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलियाने 16 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे, तर न्यूझीलंड 14 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Web Title: Refusal to play Pakistan in World Championship could cost India ICC World Cup 2021 spot: Report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.