मोहाली : पुढील महिन्यापासून भारतात सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून पाहिल्या जाणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेला आजपासून (शुक्रवार) सुरुवात होत आहे. या मालिकेत श्रेयस अय्यरला तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे. तर सूर्यकुमार यादवला वनडेमधील कामगिरीत सातत्य दाखवून द्यावे लागणार आहे.
भारताचे आघाडीचे फलंदाज कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली तसेच फिरकीपटू कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळणार नाहीत. त्यामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे संघातील सर्व खेळाडूंना आजमावून पाहण्याची चांगली संधी असणार आहे. मुंबईचे दोन फलंदाज सूर्यकुमार आणि श्रेयस आपल्यासमोरील आव्हानांचा सामना करीत आहेत. कारण, दोघांनाही आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या स्पर्धेत खेळायचे आहे.
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर म्हणाले की, अय्यर तीन सामने खेळू शकतो. पण, पुढील पाच दिवसांत तीन सामन्यांदरम्यान तो पूर्ण १०० षटके खेळतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विश्वचषक स्पर्धेत मधल्या षटकांत फिरकीपटूंचा सामना करण्यासाठी अय्यरची गरज आहे. अक्षर पटेल दुखापतग्रस्त असल्यामुळे रविचंद्रन अश्विनसाठी दरवाजे खुले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी अश्विनच्या नावाचा विचारही केला नव्हता; पण आता संघात स्थान मिळविण्यासाठी अश्विन आणि वाॅशिंग्टन सुंदर यांच्यात स्पर्धा होणार आहे.
ऑस्ट्रेलियन संघ सज्ज
दक्षिण आफ्रिकेकडून मालिकेत २-३ असा पराभव पत्करल्यानंतरही ऑस्ट्रेलियन संघ भारताचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. ऑस्ट्रेलियाने मार्चमध्ये भारताविरुद्ध वनडे मालिका जिंकली होती. विश्वचषकात दोन्ही संघ ८ ऑक्टोबरला आमने-सामने असतील. ट्रॅव्हिस हेड याच्या दुखापतीमुळे मार्नस लाबुशेन याला संधी मिळण्याची शक्यता आहे. लाबुशेन या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल.
श्रेयस अय्यर मागील सहा महिन्यांपेक्षा जास्त काळापासून क्रिकेट खेळलेला नाही. स्ट्रेट फ्रॅक्चरची शस्त्रक्रिया केल्यानंतर परतलेला अय्यर आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कंबरेच्या दुखापतीमुळे बाहेर झाला. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्न उपस्थित झाला आहे.
स्टार्क, मॅक्सवेल मुकणार
ऑस्ट्रेलियाचे स्टार खेळाडू मिशेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल पहिल्या एकदिवसीय लढतीला मुकणार आहेत. खांदेदुखीमुळे स्टार्क जुलैपासून संघाबाहेर आहे. मॅक्सवेलच्या पायाला मागील वर्षी गंभीर दुखापत झाली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सरावादरम्यान त्याचा पाय मुरगळला होता.
संघ पुढीलप्रमाणे
भारत : लोकेश राहुल (कर्णधार), रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, शार्दुल ठाकूर, वाॅशिंग्टन सुंदर, आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), ॲलेक्स कॅरी, नॅशन एलिस, कॅमेरून ग्रीन, ॲडम झम्पा, मार्कस स्टाॅयनिस, मिशेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वाॅर्नर, जोश हेजलवूड, स्पेंसर जाॅनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅट शाॅर्ट.
Web Title: Rehearsal of ODI World Cup from today; India-Australia 1st ODI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.