अबुधाबी : पांड्या बंधूंमधील (हार्दिक आणि कृणाल) संबंध क्रिकेटच्या मैदानावरदेखील पाहायला मिळते. आक्रमक फलंदाजीचे अनुभव आणि टिप्स ते एकमेकांमध्ये शेअर करतात. आमच्यातील संबंध सांस्कृतिक सीमेपलीकडचे असून मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून एका सूत्रात बांधलो गेलो आहोत,’असे मत आक्रमक फलंदाज कीएरोन पोलार्ड याने व्यक्त केले आहे.
गतविजेता मुंबई संघ सहाव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये दाखल झाला आहे. या मोहिमेत पांड्या बंधू आणि पोलार्ड या दिग्गजांचे अमूल्य योगदान राहिले. मुंबई इंडियन्सच्या ट्विटर हॅन्डलवर वेस्ट इंडिजचा हा दिग्गज खेळाडू म्हणाला, ‘मी नेहमी सांगतो की, आमच्याकडे हार्दिक पांड्या आहे आणि त्याहून हुशार आणखी एक पांड्या (कृणाल) आहे. आमचे मैदानाबाहेरील संबंध आम्ही क्रिकेट मैदानावरदेखील कायम राखतो.
आम्ही जसे आहोत त्याच भावनेतून इतरांना मदत करतो. मैदानावर कुणाला मार्गदर्शन करताना काहीही कसर शिल्लक ठेवत नाही.’आत्मविश्वास आणि स्वत:ला पाठिंबा देण्यात मी तसेच हार्दिक सारखेच आहोत. दोघांमध्ये मोठे फटके विशेषत: उत्तुंग षटकार खेचण्याची क्षमता आहे. पांड्या बंधू मोकळ्या मनाचे असून, स्वत:चा मुद्दा ठेवण्यासाठी ओळखले जातात. हार्दिक आत्मविश्वासाने स्वत:ला पाठिंबा देतो, हे पाहून तो आणि मी सारखा वाटतो,’असे मत पोलार्डने व्यक्त केले. पोलार्डने यंदा २५९ तर हार्दिकने २७८ धावा केल्या असून, त्यात २५ षटकारांचा समावेश आहे.