(दक्षिण आफ्रिका) : इंग्लंडने औपचारिकता राहिलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा ५९ धावांनी पराभव केला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर तिसरा सामना जिंकत इंग्लंडने क्लीनस्वीप टाळला.
डेव्हिड मलान (११८) आणि कर्णधार जोस बटलर (१३१) यांच्या शतकी तडाख्याच्या जोरावर इंग्लंडने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर ५० षटकांत ७ बाद ३४६ धावांचा डोंगर उभारला. यानंतर दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या जोफ्रा आर्चरच्या (६/४०) भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेचा डाव ४३.१ षटकांत २८७ धावांत संपुष्टात आला. आर्चरने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणादाण उडवताना मधल्या फळीला खिंडार पाडले. फिरकीपटू आदिल राशिदनेही (३/६८) शानदार गोलंदाजी केली.
यजमानांकडून हेन्रीच क्लासेन (६२ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ८० धावा) आणि सलामीवीर रीझा हेंड्रिक्स (६१ चेंडूंत ६ चौकारांसह ५२ धावा) यांनी अपयशी झुंज दिली. त्याआधी, मलान आणि बटलर यांनी चौथ्या गड्यासाठी २११ चेंडूंत २३२ धावांची जबरदस्त भागीदारी करत इंग्लंडला ३ बाद १४ अशा अवस्थेतून सावरले.
मलानने ११४ चेंडूंत ७ चौकार व ६ षटकारांसह ११८, तर बटलरने १२७ चेंडूंत ६ चौकार व ७ षटकारांसह १३१ धावांचा तडाखा दिला. यानंतर मोइन अलीनेही २३ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४१ धावा कुटत इंग्लंडला भलीमोठी मजल मारून दिली. वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी (४/६२) आणि मार्को येनसेन (२/५३) यांनी दक्षिण आफ्रिकेकडून चांगला मारा केला.संक्षिप्त धावफलक :इंग्लंड : ५० षटकांत ७ बाद ३४६ धावा (जोस बटलर १३१, डेव्हिड मलान ११८, मोइन अली ४१; लुंगी एनगिडी ४/६२, मार्को येनसेन २/५३) वि. वि. दक्षिण आफ्रिका : ४३.१ षटकांत सर्वबाद २८७ धावा (हेन्रीच क्लासेन ८०, रीझा हेंड्रिक्स ५२, तेम्बा बवुमा ३५, वेन पार्नेल ३४; जोफ्रा आर्चर ६/४०, आदिल राशिद ३/६८.)सामनावीर : जोस बटलर