वर्ल्डकप जिंकण्याची जिद्द कायम - स्मृती मानधना 

विश्वचषक जिंकण्याचे आमचे स्वप्न भंगले असले तरी, अजूनही ते मनात फुललेले आहे. चुका सुधारून पुन्हा नव्या जोमाने ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी आतापासूनच तयारीला लागू, असे मत भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची फलंदाज स्मृती मानधनाने आज व्यक्त केले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 08:36 PM2017-08-03T20:36:00+5:302017-08-03T23:26:36+5:30

whatsapp join usJoin us
Reminders to win World Cup - Memory honor | वर्ल्डकप जिंकण्याची जिद्द कायम - स्मृती मानधना 

वर्ल्डकप जिंकण्याची जिद्द कायम - स्मृती मानधना 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

श्रीनिवास नागे
सांगली, दि. 3 - विश्वचषक जिंकण्याचे आमचे स्वप्न भंगले असले तरी, अजूनही ते मनात फुललेले आहे. चुका सुधारून पुन्हा नव्या जोमाने ही स्वप्नपूर्ती करण्यासाठी आतापासूनच तयारीला लागू, असे मत भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची फलंदाज स्मृती मानधनाने  आज व्यक्त केले.
ती म्हणाली, "माझी ही पहिलीच विश्वचषक स्पर्धा होती. त्यामुळे उत्सुकता खूप ताणली गेली होती. सहा महिने मी दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होते. पूर्वीसारखीच पूर्ण क्षमतेने खेळू शकेन की नाही, याची खात्री नव्हती. तरीही लय सापडली आणि मला चांगला खेळ दाखविता आला. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये ज्यापद्धतीने मी खेळ केला, त्यापद्धयीने पुढे सातत्य राखता आले नाही, याचेही वाईट वाटते. या विश्वचषक स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक भारतीय क्रिकेटरने वेगवेगळ्या सामन्यांत योगदान दिले. त्यामुळे प्रत्येक सामन्यातील ‘प्लेअर ऑफ द गेम’ वेगवेगळे ठरले. ही टीमसाठी अत्यंत जमेची बाजू होती. दडपण प्रत्येक सामन्यात होते. तरीही आम्ही त्यावर मात करण्यात यशस्वी होत गेलो. शेवटच्या सामन्यात आम्हाला अनुभवाची कमतरता जाणवली."
ती म्हणाली की,"अंतिम सामन्यात पूनम राऊत आणि वेदा कृष्णमूर्तीची जोडी जमलेली होती, तोपर्यंत आम्हाला जिंकण्याची खात्री वाटत होती. पण अचानक दोघी बाद झाल्याने आम्ही हताश झालो. पराभव झाल्यानंतर आम्ही कोणाशीही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हतो. तरीही भारतात परतल्यानंतर लोकांनी ज्यापद्धतीने आमचे स्वागत केले, ते पाहून मनाला आधार मिळाला. आम्ही लोकांची, क्रिकेटप्रेमींची मने जिंकली, याचे समाधान वाटते. विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न जिद्दीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण यश मिळाले नाही. भविष्यात हेच स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आमची तयारी असेल."
"विश्वचषक स्पर्धेत सर्वात जास्त आव्हानात्मक संघ ऑस्ट्रेलियाचा होता. त्यांच्याविरोधात खेळण्यासाठी पूर्ण क्षमतेने खेळतानाच अचंबित करणारी खेळी आवश्यक होती. तीच खेळी हरमनप्रीत कौरने केली. त्यामुळेच उपांत्य सामन्यात आम्हाला विजय मिळाला. माझ्या आजवरच्या प्रवासात आई-बाबा, भाऊ आणि माझे गुरु अनंत तांबवेकर यांचे सर्वाधिक पाठबळ होते. या यशाचे खरे श्रेय मी त्यांना देते,"असेही तिने सांगितले.  

विराट कोहली आदर्श
आजच्या घडीला विराट कोहली हा क्रिकेटमधील माझा आदर्श आहे. सहकारी खेळाडूंमध्ये साºयाच माझ्या आवडीच्या आहेत. कोणा एकीचे नाव मी घेणार नाही, असे स्मृतीने सांगितले. 

महिला क्रिकेटसाठी चांगले दिवस
विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीवर नजर टाकल्यास भारतीय महिला क्रिकेटसाठी आता चांगले दिवस आले आहेत. आयपीएलच्या माध्यमातून आणखी चांगले दिवस येऊ शकतील. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. महिला क्रिकेटपटंसाठी आयपीएल हवी आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाकडून आवश्यक सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत, असेही स्मृतीने सांगितले. 

...आणि मी डावखुरी झाले!
क्रिकेट खेळताना नेहमी मी माझ्या भावाला फलंदाजी करताना पहात होते. तो डावखुरा फलंदाजी करायचा. वडिलांनी त्याला मुद्दाम तसेच शिकवले. त्याची फलंदाजी पाहून मीसुद्धा डावखुरी झाले. गोलंदाजी उजव्या हाताने करते. वास्तविक हा अनुकरणाचा भाग आहे, असे सांगताना स्मृतीच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

Web Title: Reminders to win World Cup - Memory honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.