मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाबाबत मोठी माहिती समोर येत आहे. भारतीय संघाची एकेकाळची द वॉल असलेल्या राहुल द्रविडने प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिला आहे. द्रविडसोबतचा हा करारा २०२३ पर्यंत असेल. एका वृत्तानुसार राहुल द्रविडने भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्यास सहमती दर्शवली आहे. आयपीएल २०२१ साठी दुबईमध्ये पोहोचलेले बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी राहुल द्रविडसोबत चर्चा केली होती. दोघांनीही भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्याची विनंती राहुल द्रविडला केली होती. अखेरीस द्रविडने प्रशिक्षक पदाची सूत्रे स्वीकारण्यास होकार दिला.
टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार द्रविड टी-२० विश्वचषकानंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाशी जोडला जाईल. म्हणजेच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडसमोर पहिले आव्हान न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या वनड मालिकेचे असेल.
आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर बीसीसीआयच्या एका बड्या अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास द्रविडने होकार दिला आहे. द्रविड लवकरच नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक पद सोडणार आहे. मात्र यावर बीसीसीआयची अधिकृत प्रतिक्रिया समोर येणे बाकी आहे.
राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक बनवल्यानंतर त्याचा विश्वासपात्र असलेल्या मुंबईच्या पारस म्हांब्रे याला भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. याशिवाय विक्रम राठोड हे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायम राहतील. तर फिल्डिंग कोच आर.श्रीधर यांच्या रिप्लेसमेंटसाठी कुठलेही नाव निश्चित झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार राहुल द्रविडसोबत मुख्य प्रशिक्षकपदासाठी दोन वर्षांचा करार झाला आहे. याचा अर्थ हा करार २०२३च्या विश्वचषकापर्यंत असेल. या काळात वेतन म्हणून द्रविडला दरवर्षी १० कोटी रुपये वेतन मिळेल. राहुल द्रविडची गेल्या महिन्यातच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र भारतीय क्रिकेटच्या विकासाठी बीसीसीआयला प्रशिक्षक पदासाठी तगडा उमेदवार हवा होता. त्यासाठी गांगुली आणि जय शाह यांच्यासमोर राहुल द्रविड हे नाव होते. अखेरीस या भूमिकेसाठी राहुल द्रविडचीच निवड करण्यात आली. आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेमधून गांगुली ही जबाबदारी स्वीकारणार आहे.