कोरोना व्हायरसच्या संकटात इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2020) होणार की नाही याबाबत साशंकता होती. BCCIनं आयपीएल आयोजन करण्याचे आव्हान उचलले आणि UAEत स्पर्धा यशस्वी करून यशही मिळवले. बीसीसीआयच्या मदतीला अमिराती क्रिकेट बोर्ड ( ECB) ही आले. याचा मोठा फायदा UAE क्रिकेट मंडळाला झाला. बीसीसीआयनं तगडी रक्कम देऊन त्यांचा मोठा आर्थिक फायदा करून दिला.
29 मार्च 2020मध्ये होणारी आयपीएल कोरोना व्हायरसच्या काळात दोन वेळा स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याच काळात देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली अन् आयपीएल 2020वरील अनिश्चिततेचं सावट अधिक गडद होत गेलं. ऑस्ट्रेलियात होणारी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द करण्यात आल्यानं बीसीसीआयला ऑक्टोबर-नोव्हेंबरची विंडो आयपीएल आयोजनासाठी मिळाली, परंतु देशातील कोरोना परिस्थिती सुधरत नव्हती. याचवेळी बीसीसीआयनं UAEचा पर्याय शोधला आणि UAEनंही सकारात्मकता दाखवली. UAE सरकार आणि क्रिकेट मंडळानं मिळून आयपीएलचे यशस्वी आयोजन करण्यात बीसीसीआयला मदत केली.
मुंबई इंडियन्सनं अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून पाचव्यांदा आयपीएल जेतेपद जिंकले. बंगळुरू मिररच्या माहितीनुसार BCCIनं आयपीएल 2020चे आयोजन करणाऱ्या ECBला 100 कोटी दिले. दुबई, शाहजाह व अबु धाबी येथे स्पर्धेचे सामने पार पडले. हीच लीग भारतात पार पडते तेव्हा बीसीसीआयला सलंग्न संघटनांना 60 सामन्यांसाठी केवळ 60 कोटीच द्यावे लागतात. त्या तुलनेत ECBला मिळणारी रक्कम ही अधिकच आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार एका सामन्यासाठी 1 कोटी असे राज्य संघटनांना दिले जातात. बीसीसीआयने यंदा ही रक्कम 30 ते 50 लाख वाढवले.
100 कोटी हे फक्त ECBला बीसीसीआयकडून मिळाले. या व्यतिरिक्त UAEच्या 14 फाईव्ह स्टार हॉटेल्सना झालेल्या कमाईचा आकडा वेगळाच आहे.