नवी दिल्ली : सध्याच्या घडीला प्रत्येक खेळाडू आहारासाठी सजग असतो. भारताचा कर्णधार विराट कोहली तर व्यायाम आणि आहारावर अधिक भर देतो. कोहलीबरोबर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू आहारावर बर देतात. पण काही संशोधकांनी कोहलीसह भारतीय संघाला नेमके काय खायला हवे, हा सल्ला दिला आहे. या सल्ल्यानुसार कोहली आणि भारतीय संघाने 'कडकनाथ चिकन' खायला हवे, असे या या संशोधकांनी बीसीसीआयला एका पत्राद्वारे विनंती केली आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात चांगल्या फॉर्मात आहे. आता ते चौथा कसोटी सामना जिंकून ऐतिहासिक मालिका विजय मिळवतील, अशी स्वप्न भारतीयांना पडली आहेत आणि ती पूर्णही होऊ शकते, असे दिसत आहे.
मध्यप्रदेश येथील झाबुआ कृषि विज्ञान केंद्रातील काही संशोधकांनी नवीन शोध लावला आहे. यानुसार 'कडकनाथ चिकन' हे कोहली आणि भारतीय संघासाठी उत्तम असल्याचे म्हटले गेले आहे. या केंद्रातील संशोधकांनी सांगितले की, " कोहली आणि भारतीय संघासाठी 'कडकनाथ चिकन' हा आहारातील उत्तम पर्याय आहे. त्यांनी 'कडकनाथ चिकन'चे सूप प्यायल्यास त्यांच्या शरीरास ते चांगले असेल. "
कडकनाथ चिकनचे फायदे जाणून घ्या...साधारण चिकनमध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट यांचे प्रमाण जास्त असते. हे चिकन खेळाडूंसाठी चांगले नसल्याचे म्हटले जाते. 'कडकनाथ चिकन'मध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट यांचे प्रमाण कमी आहे, त्याचबरोबर 'कडकनाथ चिकन'मध्ये प्रोटीन आणि आयरनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे खेळाडूंसाठी 'कडकनाथ चिकन' हे उपयुक्त ठरू शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.