मुंबई - कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा ३२ व्या वर्षात मोठया दिमाखात प्रदार्पण करीत आहे. यावर्षी स्पर्धेतील संघांची संख्या २० वरून २४ अशी करण्यात आली आहे. सराव शिबिरात ज्या राखीव खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली नाही, अशा खेळाडूंना संधी मिळावी म्हणून ३ नवीन संघ या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. २४ संघ ६ गटांमध्ये विभागलेले आहेत. या स्पर्धेतील सामना दोन दिवसांचा साखळी तसेच बाद पध्दतीने खेळवला जाईल.
एकूण ३९ सामन्यांची ही स्पर्धा ४ मे २०२४ ते २५ मे २०२४( ४मे व ५ मे/११ मे व १२ मे/ १८ मे व १९ मे/ २१ मे व २२ मे/ २४ मे व २५ मे) या कालावधीत कांदिवली, दहिसर, विरार, अदानी मैदान डहाणू, कलीना, माटुंगा, आरसीएफ चेंबूर, वांगणी, बदलापूर नवी मुंबईत बेलापूर, नेरुळ ह्या ठिकाणी खेळवली जाईल. ही स्पर्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबीरातील १६ वर्षा खालील मुलांमध्ये खेळवली जाते. यास्पर्धेचे उदघाटन भारताचा युवा फलंदाज सर्फराज खान आणि भारतीय प्रथम कसोटी महिला क्रिकेट पंच वृंदा राठी ज्या सध्या आयसीसी पंचांच्या विकास पॅनेलची सदस्य आहेत त्यांच्या हस्ते होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही एका जेष्ठ क्रीडापटूना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. तसेच न्यू हिंद स्पोट्रींग क्लबतर्फे दिवंगत ज्येष्ठ पत्रकार के. वि. वि. करमरकर ह्यांच्या स्मरणार्थ एका क्रीडा पत्रकाराचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल. मागील वर्षा पासून स्पर्धेत हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांना गोविंद कोळी स्मरणार्थ पुरस्कार देण्यात आला आणि या वर्षी हा पुरस्कार देण्यात येईल. स्पर्धेचा वाढता डोलारा त्याचबरोबर येणारी आर्थिक वाढ यांकरिता आम्हास मुंबई क्रिकेट असोसिएशनने मोठे योगदान दिले होते, नेहमीप्रमाणे यावर्षी देखील आम्हाला असेच यथोचित सहकार्य लाभेल अशी आशा आहे.. स्पर्धेत सहभागी होणारे सर्व ४८० खेळाडूंना वैयक्तिक विमा संरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आयोजकांनी सांगितले.