लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडू ॲलन बॉर्डर यांच्याबद्दल संघातील सर्व खेळाडूंना आदरच आहे. पण त्यांनी टीका केली म्हणून रणनीतीत बदल करण्याचा संघाचा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्टीकरण ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज ॲलेक्स कॅरी याने दिले आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मैदानावरील वागणुकीवरून ॲलन बॉर्डर यांंनी टीका केली होती.
कॅरी पुढे म्हणाला, १० ते १२ महिन्यांपासून आम्ही ज्या प्रकारचे क्रिकेट खेळतो आहे, त्यात कुठलाही बदल आम्ही एका पराभवामुळे करणार नाही. तसेच बाहेरच्या लोकांना आमच्याविषयी काय वाटते यापेक्षा प्रत्यक्ष मैदानावर काय घडते आहे, याचा आम्ही जास्त विचार करतो. नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव झाल्यावर ॲलन बॉर्डर यांनी संघावर टीका केली होती. विशेषकरून स्टीव्ह स्मिथच्या मैदानावरील वागणुकीवर ते नाराज होते. बॉर्डर म्हणाले, खेळाडूंनी स्वत:ची प्रतिमा जपण्यापेक्षा दर्जेदार खेळ करण्यावर जास्त लक्ष दिले पाहिजे. इकडे परिस्थिती अशी आहे की, जडेजाचा चेंडू खेळण्यात असमर्थ ठरल्यानंतर स्मिथ त्याच्याकडे बघून गोलंदाजीचे कौतुक करतो. मला हे सगळं हास्यास्पदच वाटते.
बॉर्डर यांच्या या टीकेला उत्तर देताना कॅरी म्हणाला, ‘आम्ही ॲलन बॉर्डर यांचा खूप सन्मान करतो. पण प्रत्येक खेळाडूची क्रिकेट खेळण्याची पद्धत वेगळी असते. त्यांचा इशारा स्टीव्ह स्मिथकडे होता. पण तो कुठल्याही परिस्थितीत त्याच शैलीने क्रिकेट खेळतो. तसेच भारतीय संघातसुद्धा त्याचे अनेक मित्र आहेत. त्यामुळे एखाद्या चेंडूचे त्याने कौतुक केले असेल तर इतके वावगे वाटण्यासारखे काहीच नाही.’
पराभवानंतरही ऑस्ट्रेलियन संघ सकारात्मक
नागपूर कसोटीत आमचा दारूण पराभव झाला असला तरी संघाचे मनोबल अजिबात खचलेले नाही. १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीला आम्ही सकारात्मकतेनेच सामोरे जाणार असल्याचे ॲलेक्स कॅरी म्हणाला. चार सामन्यांची कसोटी मालिका ही खूप मोठी असते. त्यामुळे पुनरागमनाची आमच्याकडे चांगली संधी आहे. दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियन संघ विजयासाठीच मैदानात उतरेल.
Web Title: respect for borders; But the strategy will not change - alex carey
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.