टीम इंडियाने तीनपैकी तीन सामने जिंकले, पण चाहत्यांनी कृतीतून इतरांना जिंकले, असे वाटत नाही. भारताचा सहभाग नसलेल्या सामन्यातील गर्दी पाहिल्यानंतर चाहत्यांना हा खेळ खरोखर आवडतो की केवळ भारताचे स्टार्स आणि त्यांच्या सभोवतालचा झगमगाट आवडतो, अशी शंका येते.
आपल्या चाहत्यांनी दिल्लीत नवीन उल हकला, तर अहमदाबादमध्ये बाबरला टार्गेट केले. जो समाज ‘संपूर्ण जग एक कुटुंब मानतो’, तो इतका संकुचित कसा काय, हे अकल्पनीय वाटते. २०३६ च्या ऑलिम्पिकची बोली जिंकायची असेल, तर अधिक तटस्थ दृष्टिकोन स्वीकारावा लागेल, असे न झाल्यास भारताबाबत जगात नकारात्मकता पसरेल.
अहमदाबादमध्ये पाकचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी हे आयसीसीचे नव्हे तर बीसीसीआयचे आयोजन असावे, असे भाष्य केले होते. त्यावेळी मी समालोचन करीत होतो. भारतीयांच्या पक्षपाती वर्तनाबद्दल मला वाईट वाटत होते. तुमच्या आवडत्या संघाचे समर्थन जरूर करा, त्याचवेळी विरोधी संघाची हुर्रे करण्याचा अधिकार नाही, हे देखील विसरू नका. गुरुवारी पुण्यात भारत - बांगलादेश सामना रंगेल. माझ्या मते भारतासाठी हा सामना सोपा असेल. शार्दुलऐवजी शमीला खेळताना पाहणे आवडेल. कर्णधार या नात्याने मी शमीला संधी दिली असती. शार्दुलच्या जागी शमी हा एक बदल होऊ शकला, तर ठिक, अन्यथा मागच्या सामन्यातील भारतीय संघ कायम असू शकतो.
रोहित शर्माने भारतीय संघाला फार पुढे नेऊन ठेवले. तो स्वत: निर्भिडपणे खेळतो. बांगलादेशविरुद्ध तो मोठी खेळी करेल, यात शंका नाही. पाकिस्तानविरुद्ध श्रेयस अय्यरने आखूड टप्प्याचे चेंडू दमदारपणे खेळले, हे पाहून आनंद झाला. न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी सामन्यांमध्ये त्याला याच बाबींची पुनरावृत्ती करावी लागेल. स्तंभ लिहीत असताना शाकिब अल हसन खेळणार की नाही याबाबत स्पष्टता नव्हती. काहीही असो, बांगलादेश स्वत:च्या जाळ्यात अडकलेला दिसतो, ते भारताला कोंडीत पकडतील, असे वाटत नाही.
अफगाणिस्तानने इंग्लंडला पराभूत केले तर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारताच खळबळ माजली. दोन निकालांनी गुणतालिकेत बदल झाले. निकालांमुळे ऑस्ट्रेलिया आनंदी झाला असावा.
माझ्या मते ज्या संघांनी मधल्या षटकांत धावांची लय गमावली, त्यांना फटका बसला. चौकार मारता येत नसतील, तर स्ट्राईक रोटेट करण्यात हरकत नाही. ही क्षमता बाळगणाऱ्या भारतीय मधल्या फळीने मात्र प्रभावित केले.
(गेमप्लॅन/दिनेश चोप्रा मीडिया)
Web Title: Respect other teams while supporting India!- Gautam Gambhir
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.