नवी दिल्लीः वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात झंझावाती दीडशतकी खेळी करून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने तीन विक्रम मोडले. सगळ्यात कमी डावांमध्ये १० हजार धावांचा पल्ला गाठून त्यानं आपली 'विराट शक्ती' दाखवून दिलीय. त्यामुळे पुन्हा एकदा, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची तुलना सुरू झालीय. या दोघांमध्ये महान कोण, यावरून जोरदार चर्चा रंगतेय. त्यात, भारताचा माजी फिरकीपटू हरभजनसिंग आपल्या लाडक्या सचिनपाजीच्या बाजूनं उभा राहिलाय.
'विराट कोहलीला माझा सलाम. तो दरवेळी एका जिद्दीनं, प्रेरणेनं मैदानात उतरतो. तो जबरदस्त फलंदाज आहे. रन मशीन आहे. एक हाती सामना जिंकून देण्याची ताकद विराटमध्ये आहे. गेल्या काही वर्षांत जेवढे फलंदाज पाहिलेत, त्यात विराट अव्वल आहे. पण, त्यानं कितीही विक्रम मोडले, तरी सचिन पाजीसाठी मनात असलेला आदर, सन्मान कायम राहील. पाजीचं स्थान नेहमीच सर्वात वरचं आहे', अशी मनमोकळी प्रतिक्रिया हरभजनसिंगनं व्यक्त केली. विराट कोहलीनं जे मिळवलंय-कमावलंय, त्याचं नक्कीच कौतुक आहे. फिटनेसवर त्याने प्रचंड मेहनत घेतलीय. तो तरुणांसाठी प्रेरणास्रोत आहे, अशी शाबासकीही त्यानं 'कॅप्टन कोहली'ला दिली.
२१२ वनडे सामन्यांमध्ये २०५ व्या डावात विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील १० हजार धावा पूर्ण केल्या. सचिन तेंडुलकरला हा पल्ला गाठण्यासाठी २५९ इनिंग्ज लागल्या होत्या. त्याचा विक्रम कोहलीनं बुधवारी विशाखापट्टणम येथे मोडला. दहा हजार धावा काढणारा तो भारताचा पाचवा तर जगातील १३ वा फलंदाज ठरलाय. मायदेशात सर्वात कमी डावांत चार हजार धावा करण्याचा विक्रमही आधी सचिनच्या नावावर होता. तोही विराटनं मोडलाय आणि विंडीजविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीतही सचिनला मागे टाकत त्यानं अव्वल स्थान पटकावलंय. स्वाभाविकच, त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. सचिनचे चाहतेही विराटच्या पराक्रमाला दाद देताहेत, पण त्यांच्या मनातील सचिनचं स्थान अढळ असल्याचं दिसतंय. हरभजनची प्रतिक्रियाही तेच सांगून जाते.