-व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...
आयपीएलच्या अकराव्या सत्राने धमाकेदार सुरुवात झाली. ज्या दिमाखदार सोहळ्याने स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पार पाडला,
त्याहून जास्त थरार वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या सामन्यात पाहायला मिळाला. चेन्नई सुपरकिंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मिळवलेला नाट्यमय विजय टी२० आणि आयपीएल स्पर्धेतील थरार काय असतो, हे दाखवणारा ठरला.
नवोदित लेगस्पिनरने शानदार कामगिरी करत पहिल्याच सामन्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मयांक मारकंदे या सामन्यानंतर सर्वांच्याच लक्षात राहिल. त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी यांसारख्या स्टार खेळाडूंना तंबूत परतावले होते. पण द्वेन ब्रावोची तुफानी खेळी आणि त्यानंतर जाधवने चढवलेला विजयाचा धामा‘केदार’ कळस याजोरावर चेन्नईने बाजी मारली. दोन वर्षांनी पुनरागमन करताना चेन्नईने आयपीएल स्पर्धेतील सर्वोत्तम विजयांपैकी एक विजय नोंदवला. याचे श्रेय प्रामुख्याने द्वेन ब्रावोलाच द्यायलाच पाहिजे. शानदार षटकार ठोकण्याचे त्याचे कौशल्य कौतुकास्पद आहे. त्याचवेळी, पहिल्यांदाच यावेळी चेन्नई संघाला इतका मोठा पाठिंबा मिळाला होता आणि ही मोठी उपस्थिती करिष्माई खेळाडू एमएस धोनीसाठी होती.
आमच्या घरच्या मैदानावर उप्पल येथेही सनरायझर्स हैदराबाद संघाला पाठिराख्यांचा असाच मोठा पाठिंबा मिळतो. आमचे चाहते कायम आम्हाला प्रोत्साहन देत असतात आणि सामन्यात एक अदृश्य अतिरिक्त १२वा खेळाडू म्हणून आम्हाला सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरीत करत राहतात. त्यांचा उत्साह आमच्यासाठी खूप मोलाचा असून राजस्थान रॉयल्सविरुद्ध जेव्हा आम्ही पहिला सामना खेळण्यास उतरु तेव्हा याच उत्साहाच्या जोरावर आम्ही सर्वोत्तम खेळ करुन चाहत्यांचा विश्वास सार्थ ठरवू.
हैदराबादमध्ये जोरदार पावसानंतरही आमची तयारी पूर्ण झाली आहे. यंदाच्या सत्रासाठी झालेल्या लिलाव प्रक्रीयेतून आम्ही खूश असून आमचा संघ चांगला बनला आहे आणि त्याचबरोबर संघ समतोल आहे. त्याचवेळी काही कारणास्तव डेव्हीड वॉर्नरची राहणारी अनुपस्थिती आमच्यासाठी सर्वात मोठी कमतरता असेल. पण त्यानंतरही आम्ही मोठ्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करु असा विश्वास आहे. केन विलियम्सन हा शानदार फलंदाज असून प्रेरणादायी कर्णधार आहे. तो भक्कम नेतृत्व करेल याची खात्री आहे.
आमची फलंदाजी खोलवर असून गोलंदाजीत वैविध्य आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार आम्ही संघात आवश्यकत ते बदल करु शकतो. टी२० क्रिकेटमध्ये परिस्थितीनुसार तुम्ही कसे जुळवून घेता हे महत्त्वाचे असते. बाहेच्या मैदानावर खेळण्याआधी आम्ही सुरुवातीचे दोन सामने घरच्या मैदानावर खेळणार आहोत. त्यामुळे हे दोन्ही सामने जिंकून सकारात्मक उत्साह मिळवण्याचा आमचा निर्धार आहे.
Web Title: The response of fans is encouraging
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.