irani cup 2024 mumbai squad : इराणी चषक २०२४ साठी रेस्ट ऑफ इंडियाचा संघ जाहीर झाला आहे. मराठमोळा ऋतुराज गायकवाड या संघाचे नेतृत्व करेल. ऋतुराजच्या संघाचा सामना अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील मुंबईसोबत होईल. ही लढत लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर १ ते ५ ऑक्टोबर २०२४ दरम्यान पार पडेल.
ध्रुव जुरेल आणि यश दयाल हे बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा भाग आहेत. पण, त्यांची रेस्ट ऑफ इंडियाच्या संघात निवड करण्यात आली आहे. एकूणच त्यांची उपस्थिती अनिश्चित आहे. तसेच दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या संघात कायम ठेवण्यात आलेल्या सर्फराज खानला मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सोडण्यात येईल. त्याची देखील उपस्थिती अद्याप निश्चित नाही. एकूणच जुरेल, दयाल आणि सर्फराज यांना टीम इंडियात स्थान मिळाले नाही तर ते इराणी चषकात दिसतील. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून खेळवला जाईल.
मुंबईचा संघ -अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तोमर, सिद्धांत अधातराव, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशू सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, जुनेद खान, रॉयस्टन डायस.
रेस्ट ऑफ इंडियाचा संघ -ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईस्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, इशान किशन, मानव सुथार, सारंश जैन, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चाहर.
दरम्यान, २०१५-१६ पर्यंत मुंबईने ४१वेळा रणजी ट्रॉफी जिंकली होती. पुढील सहा स्पर्धांमध्ये संघाला पुन्हा ट्रॉफी जिंकता आली नाही. २०१६ आणि २०२१ मध्ये मुंबईचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, पण त्यांना सौराष्ट्र आणि मध्य प्रदेशकडून पराभव स्वीकारावा लागला होता. गेल्या वर्षी पुन्हा अजिंक्य रहाणे टीम इंडियातून बाहेर पडला. त्यानंतर मुंबईने त्याला आपल्या रणजी संघाचा कर्णधार बनवले. रहाणेच्या नेतृत्वात संघाने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत विदर्भाचा पराभव केला आणि मुंबईने ४२व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकण्याची किमया साधली.