भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यानं त्याच्या वडिलांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. हिमांशू पांड्या ( Himanshu Pandya) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. कृणाल आणि हार्दिक यांच्या वडिलांच्या निधनाच्या वृत्तानं क्रीडा विश्वातून हळहळ व्यक्त झाली. रविवारी हिमांशू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यावेळी दोघाही भावांचा अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळाला. हार्दिकनं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे.
हार्दिकनं इंस्टाग्रामवर वडिलांसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर त्यानं लिहिलं की,''तुमच्याशिवाय या घराचा विचारच करवत नाही. आमचं तुमच्यावर प्रेम आहे आणि ते कायम राहिलच. तुमचं नाव सर्वात टॉपवरच राहील. जसं तुम्ही घरात आमच्याकडे लक्ष ठेवायचात, तसंच लक्ष तुम्ही वरूनही ठेवाल, हे मला माहित्येय. आम्हाला तुमचा नेहमी अभिमान वाटतो. rest in peace my king. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येत राहील.''
१००-१०० रुपयांची पैज लावून कृणाल-हार्दिकला बनवलं क्रिकेटपटू
सुरत येथे हिमांशू यांचे कार फायनान्सचा बिस्नेस होता आणि तो त्यांनी बंद करून ते वडोदरा येथे स्थायिक झाले. त्यांनी दोन्ही मुलांना किरण मोरे क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळवून दिला. गोरवा येथे भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये ते रहायचे. क्रिकबजला दिलेल्या एका मुलाखतीत हिमांशू यांनी एक किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की,''आम्ही पूर्वी सुरतमध्ये रहायचो आणि तेव्हा कृणाल ६ वर्षांचा होता. मी घरातच त्याचा गोलंदाजी करायचो आणि त्यावर तो जोरदार फटके मारायचा. त्याची फलंदाजी पाहून तो चांगला क्रिकेटपटू बनेल असे मला वाटायचे. त्यानंतर मी त्याला सूरतमधील रांदेड जिमखाना येथे सरावासाठी घेऊन गेलो. तेथे भारताचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांच्या मॅनेजरने त्याला फलंदाजी करताना पाहिले. त्यांनी आम्हाला वडोदराला यायला सांगितले आणि १५ दिवसानंतर कृणालला वडोदरा येथे घेऊन गेलो.''
हिमांशू दररोज ५० किलोमीटर बाईक चालवत कृणालला वडोदरात घेऊन जायचे. एवढेच नाही, तर ते कॉलेजच्या मुलांशी १००-१०० रुपयांची पैज लावायचे. माझ्या मुलाला जो बाद करेल त्याला १०० रुपये देईन, अशी ती पैज असायची. दीड-दोन तासांच्या फलंदाजीनंतरही त्याला कुणची बाद करू शकत नव्हता, असे हिमांशू यांनी सांगितले.
Web Title: Rest in peace my king: Hardik Pandya shares emotional tribute to late father Himanshu Pandya
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.