नवी दिल्ली - क्रिकेट सामन्यामध्ये एखादा फलंदाज शानदार फलंदाजी करुन शतकाच्या समीप पोहोचला असेल, तर प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाज त्याला शतकापासून रोखण्यासाठी बाद करण्याचा प्रयत्न करतात. यात चुकीचे काहीही नाही. पण एखाद्या फलंदाजाचे शतकच होऊ नये म्हणून गोलंदाज लागोपाठ वाईड चेंडू टाकत असतील तर ?. गोलंदाजांच्या अशा कृतीमुळे सहाजिकच फलंदाजी करणा-या संघाचा फायदा होईल. पण जो फलंदाज 98 धावांवर खेळतोय त्याची काय अवस्था होईल. वेस्ट इंडिजच्या रिजनल सुपर 50 स्पर्धेत आयलँडस आणि कॅट या दोन संघांमधील सामन्यादरम्यान मंगळवारी हा विचित्र प्रकार घडला. आयलँडच्या गोलंदाजांनी अशा प्रकारची गोलंदाजी केल्यामुळे समोरच्या फलंदाजाचे शतक फक्त एका धावेने हुकले. त्याला 99 धावांवर समाधान मानावे लागले.
प्रथम फलंदाजी करणा-या आयलँडसने कॅट संघाला विजयासाठी 184 धावांचे लक्ष्य दिले होते. कॅट संघाचा सलामीवीर जॅक क्रॉलने शानदार फलंदाजी केली. तो 98 धावांवर खेळत असताना त्याला शतकासाठी फक्त दोन धावांची गरज होती आणि कॅटला विजयासाठी फक्त 4 धावा हव्या होत्या. क्रॉल स्टाइकवर असताना आयलँडसचा शिने ब्रिज गोलंदाजी करत होता. क्रॉलला शतक बनवण्यापासून रोखण्याचे एकमेव उद्दिष्टय शिनेसमोर होते. त्यासाठी शिनेने लागोपाठ वाईड चेंडू टाकले. पण क्रॉलने कशीबशी एक धाव काढली आणि सीन डिकसनला स्ट्राइक मिळाली.
कॅटला विजयासाठी 1 धावेची गरज होती. क्रॉलने आपले शतक पूर्ण करावे अशी डिकसनची इच्छा होती. त्यासाठी त्याने षटकातील पाच चेंडू निर्धाव खेळून काढले. शेवटचा चेंडू डिकसनने मिडविकेटच्या दिशेने तटवला. त्यावेळी क्रॉलने आपल्या शतकाची पर्वा न करता धाव घेण्याचा इशारा केला. पण डिकसनने नकार दिला. पण आइसलँडच्या फिल्डरने तो चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला नाही व चेंडू सीमापार गेला. त्यामुळे कॅटने विजय मिळवला. क्रॉल 99 धावांवर नाबाद राहिला. तो सामना कॅटने 9 विकेटने जिंकला. क्रॉलला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. आइसलँडवर अशा प्रकारच्या खेळासाठी चौफेर टीका होत आहे.