नवी दिल्ली : ‘आयपीएल संचालन परिषदेने घेतेलेल्या निर्णयानुसार स्पर्धेतील फ्रेंचाईजींना २१ जानेवारीपर्यंत संघात कायम राहणाऱ्या खेळाडूंची नावे निश्चित करावी लागेल,’ असे आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. या आठवड्यात झालेल्या ऑनलाईन बैठकीत आयपीएल संचालन परिषदेच्या सदस्यांनी स्पर्धा आयोजनाबाबत चर्चा केली.
पटेल यांनी पुढे सांगितले की, ‘खेळाडूंना कायम राखण्याबाबत फ्रेंचाईजींना कळविण्यात आले असून अद्याप लिलाव प्रक्रियेची तारिख निश्चित करण्यात आलेली नाही. २१ जानेवारीपर्यंत फ्रेंचाईजी खेळाडू रिटेन करू शकतील आणि ट्रेडिंग विंडो ४ फेब्रुवारीला बंद होईल.’ यंदा लिलाव प्रक्रिया फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होऊ शकते.
यंदाच्या लिलाव प्रक्रियेसाठी बजेटमध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले. गतविजेते मुंबई इंडियन्स आपल्या बहुतेक खेळाडूंना कायम राखण्याची शक्यता आहे. केदार जाधव व पियुष चावला यांना सीएसके रिलीज करण्याची शक्यता आहे.