नवी दिल्ली : ‘मैदानावर पुनरागमन करणे सोपे नसतेच. मोठ्या शस्त्रक्रियेनंतर सर्वांत कठीण काम आहे, ते स्वत:मधील भीतीवर विजय मिळविण्याचे. हे प्रबळ इच्छाशक्तीवर विसंबून असते. फलंदाजी मी सहजपणे करीत असेन; पण हे काम वाटते तितके सोपे नाही...’ जखमेमुळे ६ महिने क्रिकेटपासून दूर राहिलेल्या रोहित शर्माचे हे मनोगत आहे. तो जखमेमुळे आॅक्टोबर २०१६ ते एप्रिल २०१७ या कालावधीत ६ महिने स्पर्धात्मक क्रिकेटला मुकला.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वन डे संघात पुनरागमन झाल्यापासून १० सामन्यांत ३ शतकांसह काही अर्धशतकेदेखील रोहितने ठोकली. धावताना किंवा फिरकीचा सामना करताना जखमी होण्याची भीती वाटते का, असा प्रश्न करताच रोहित हसून म्हणाला, ‘‘माझ्यासाठी खास बात ही राहिली, की पुनर्वसन कार्यक्रमातून परतलो तेव्हा आयपीएल सुरू झाले होते. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना नकारात्मक गोष्टी कधीही डोक्यात आल्या नाहीत.’’
लंकेविरुद्धच्या नुकत्याच आटोपलेल्या मालिकेतील दुसºया सामन्यात रोहितने अर्धशतकी खेळी केली होती. ६ बळी घेणारा फिरकी गोलंदाज अकिला धनंजय याला कसे तोंड दिले, असे विचारताच रोहित म्हणाला, ‘‘मी त्या सामन्यात अकिलाचा मारा अधिक खेळू शकलो नाही. तो गोलंदाजीला आला त्याआधीच मी बाद झालो होतो; पण पुढील दोन सामन्यांत त्याला खेळताना त्रास जाणवला नाही. मी पुन्हा एक शतक ठोकले. त्याची गुगली थोडी मंद आहे; पण लेग ब्रेक तो वेगवान टाकतो.’’ आॅस्ट्रेलियाविरुद्ध आगामी मालिकेत रोहित मोलाची भूमिका वठवू शकतो; पण संघाचा उपकर्णधार असलेला रोहित प्रतिस्पर्धी संघाचा धसका न घेता परिस्थिती कशी असेल, हे ओळखून तयारी करण्यावर विश्वास ठेवतो. तो म्हणाला, ‘‘माझी तयारी परिस्थितीनुरूप असते. आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे वेगळे नाही. खेळपट्टी आणि परिस्थितीशी ताळमेळ बसविण्यात यश आले, की काम सोपे होते.’’ (वृत्तसंस्था)
एकदिवसीय सामन्यांमधील कामगिरी
13 शतके
5737 धावा
३० वर्षांच्या रोहितने १६३ वन डेंमध्ये १३ शतकांसह ५,७३७ धावा ठोकल्या आहेत. विशेष फटक्यांमुळे तो फलंदाजी करताना चाहत्यांच्या आकर्षणाचे केंद्र असतो. हे फटके शिकण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागल्याचे मत रोहितने व्यक्त केले.
Web Title: Returning to the field is not easy - Rohit Sharma, away from cricket for six months due to wounds
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.