लंडन : ‘भारतात काहींनी माझ्या विरोधात मोर्चा उघडला होता. टीम इंडियाचा कोच म्हणून मी अपयशी ठरेल, असे त्यांना नेहमी वाटायचे. अशा लोकांचा सामना करण्यासाठी मी गेंड्याची कातडी विकसित केली आणि त्यांना पुरून उरलो,’ असे मोठे वक्तव्य माजी कोच रवी शास्त्री यांनी केले आहे.
इंग्लंडच्या ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी ‘ईसीबी’चे नवे क्रिकेट संचालक रॉबर्ट की यांनादेखील ईर्षा बाळगणाऱ्यांचा सामना करण्यासाठी ‘ड्यूक’ चेंडूसारखे ‘गेंड्याचे कातडे’ (कणखरपणे) पांघरूण कारभार करण्याचा सल्ला दिला. शास्त्री हे २०१४ ते २०२१ या कालावधीत आधी संचालक आणि नंतर भारतीय संघाचे मुख्य कोच होते.
शास्त्री यांनी कुणाचे नाव घेतले नाही. मात्र, त्यांच्या नियुक्तीवर सौरव गांगुली समाधानी नव्हता, असे मानले जात आहे. शास्त्री यांचे मत असे की, जगात सर्वत्र राष्ट्रीय संघ अशाच पद्धतीने काम करतो. महत्त्वाची बाब ही की, तुम्हाला लढण्याच्या आणि जिंकण्याच्या इराद्याने काम करावे लागते. सांघिक संस्कृती रुजवायची झाल्यास जे चालले आहे ते बदलावे लागेल. शास्त्री यांनी या मुलाखतीत इंग्लंड संघाचा नवा कर्णधार स्टोक्स याच्या निवडीचे समर्थन केले. इंग्लंड संघाला पुढे घेऊन जाण्यास तो योग्य पर्याय असल्याचे शास्त्री यांनी म्हटले.
वादग्रस्त नियुक्तीशास्त्री हे २०१४ ला क्रिकेट संचालक बनले. या काळात भारतीय संघ विश्वचषकात ऑस्ट्रेलियाकडून उपांत्य सामन्यात पराभूत झाला. यानंतर शास्त्री यांची पदावरून उचलबांगडी झाली, तर नवा कोच म्हणून अनिल कुंबळे यांची नियुक्ती करण्यात आली. २०१७ ला मात्र शास्त्री यांना भारतीय संघाचे पूर्णवेळ कोच बनविण्यात आले. कोच बनविण्यात तत्कालीन कर्णधार विराट कोहलीची निर्णायक भूमिका होती. शास्त्री यांना कुठल्याही स्थितीत कोचपदावर आणण्याचा कोहलीचा आग्रह होता. त्यामुळे कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच कुंबळे यांना कोचपदाचा राजीनामा द्यावा लागला.
शास्त्री म्हणाले, ‘माझ्याकडे कोचिंगची डिग्री नव्हती. लेव्हल वन, लेव्हल टू? काहीही नाही. भारतासारख्या देशात ईर्षावान लोकांचा भरणा आहे. काही मंडळींचे टोळके माझे अपयश शोधत असते. माझे कातडे मात्र गेंड्याचे होते. तुमच्या ड्यूक चेंडूपेक्षाही टणक काम करायचे असेल तर अशा जाड कातडीची गरज भासते. खेळाडूंशी संवाद साधून पुढे जाणे हा माझ्या कामाचा भाग होता.’