अबूधाबी :आयपीएलमध्ये बुधवारी केकेआरविरुद्ध आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने इतिहास रचला. आतापर्यंत आयपीएलमध्ये जे कुणालाही करता आले नाही ते सिराजने करून दाखवले. रिक्षाचालकाचा मुलगा आज आयपीएलमध्ये हिरो ठरला.
सिराजची कहाणी संघर्षपूर्ण आहे. सिराजचे वडील रिक्षा चालवायचे, घरची परिस्थिती बेताचीच. क्रिकेटचे प्रशिक्षण घ्यायला पैसे नव्हते. पण सिराजने हार मानली नाही. लहानपणी क्रिकेटचे प्रशिक्षण मिळू शकले नाही. सिराज हा गल्ली क्रिकेट खेळायचा. पूर्वी फलंदाजी करायचा. नंतर तो गोलंदाजीकडे वळला. त्यात भावाचे मोठे योगदान आहे. गल्लीमध्ये सिराजच्या गोलंदाजीची चांगलीच दहशत होती. पण गल्ली सोडून मोठ्या स्तरावर त्याला खेळायला मिळत नव्हते. सिराजच्या मित्राने त्याला चारमिनार क्रिकेट क्लबमध्ये खेळायला बोलावले. ते वर्ष २०१५ २०१५ होते. सिराजने या सामन्यात भेदक गोलंदाजीच्या जोरावर अर्धा संघ गारद केला. ही कामगिरी पाहून त्याला हैदराबादच्या २३ वर्षांखालील संघात स्थान देण्यात आले.सिराजने अथक मेहनत घेतली . त्याचवर्षी त्याची निवड रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत झाली. पण त्यावर्षी तो फक्त एकच सामना खेळू शकला. पण त्यानंतर २०१६ साली मात्र सिराज हा हैदराबादचा सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज होता. या वर्षात त्याने ४१ बळी रणजी स्पर्धेत घेतले होते. त्यानंतर सिराजची गोलंदाजी ही प्रकाशझोतात येऊ लागली आणि सिराजला भारतीय संघातही स्थान मिळाले. आपल्या पहिल्याच टी-२० सामन्यामध्ये सिराजने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनची विकेट मिळवली होती.आयपीएलमध्ये सिराज २०१७ साली आला. हैदराबादच्या संघाने सिराजला मूळ किंमतीपेक्षा १३ पट रक्कम यावेळी दिली. त्यावेळी २.६० कोटी रुपयांमध्ये हैदराबादने सिराजला आपल्या संघात स्थान दिले होते. २०१८ साली आरसीबीची त्याच्यावर नजर गेली आणि त्यांनी सिराजला संघात स्थान दिले. दोन वर्षांपासून सिराज हा आरसीबीकडून खेळत आहे.