Australia Opener Batsman, IND vs AUS Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाचा तडाखेबंद सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने निवृत्ती घेतल्यामुळे यंदाच्या भारत-ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऑस्ट्रेलियन संघासमोर ओपनिंगचा मोठा प्रश्न आहे. सलामीवीर उस्मान ख्वाजाचा जोडीदार म्हणून स्टीव्ह स्मिथचा विचार सुरु असल्याच्या काही चर्चा रंगल्या होत्या. पण तो चौथ्या क्रमांकावरच खेळणार असल्याचे संघ व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता एका नवख्या आणि अवघ्या २५ वर्षीय खेळाडूला भारतीय संघाविरूद्ध कसोटी पदार्पणाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. भारत-अ संघाविरूद्ध धमाका केल्यानंतर आता तोच उस्मान ख्वाजासोबत सलामीला उतरेल असे बोलले जात आहे.
कोण आहे हा नवा खेळाडू?
१९९२ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत नवा फलंदाज पदार्पण करताना दिसू शकतो. तो उस्मान ख्वाजासोबत संघाच्या दुसऱ्या सलामीवीराची भूमिका बजावू शकतो. ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी अद्याप आपला संघ जाहीर केलेला नसला तरीही सध्याच्या घडीला २५ वर्षीय नॅथन मॅकस्वीने ( Nathan Mcsweeney )याला संघाचा ओपनर म्हणून स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.
रिकी पाँटिंग, टीम पेनकडून कौतुक
नॅथन मॅकस्वीनची ऑस्ट्रेलियन संघात कसोटी सलामीवीर म्हणून निवड होणे जवळपास निश्चित आहे. कारण रिकी पाँटिंगनेही त्याच्या नावासाठी समर्थन दिले आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेन याच्यासोबतही मॅकस्वीन नेट्समध्ये सराव करताना दिसला आहे.
भारत अ विरुद्ध दमदार कामगिरी
नॅथन मॅकस्वीनने भारत-अ विरुद्धच्या पहिल्या चार दिवसीय कसोटीत दमदार कामगिरी केली. त्याने भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ संघाचे नेतृत्व केले आणि संघाला विजयाच्या दिशेने नेले. त्याच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या सामन्याच्या दोन्ही डावात तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. नॅथन मॅकस्वीनने पहिल्या डावात ३९ तर दुसऱ्या डावात त्याने ८८ धावांची नाबाद खेळी खेळली आणि संघाला विजय मिळवून दिला.
दरम्यान, भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील दुसरा सामना ७ नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. हा सामना संपल्यानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर होऊ शकतो.