Ricky Ponting breaks down in tears - ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न ( Shane Warne Death) याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शेन वॉर्नचा सहकारी आणि जवळचा मित्र रिकी पाँटिंग याच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. माजी कर्णधार पाँटिंग आणि वॉर्न यांनी दशकाहून अधिक काळ सोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. त्यामुळेच वॉर्नची आठवण निघताच पाँटिंगला अश्रू अनावर झाले. पाँटिंगचा हा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि पाँटिंगला रडताना पाहून नेटिझन्स हळवे झाले आहेत.
''शेनच्या जाण्याने किती मोठा धक्का बसलाय, हे शब्दात सांगणे अवघड आहे. मी १५ वर्षांचा होतो तेव्हा अकादमीत त्याच्याशी माझी पहिली भेट झाली. त्याने मला माझं टोपणनाव दिलं. दशकाहून अधिककाळ आणि संघसहकारी होतो. आम्ही अनेक चढ-उतार सोबत पाहिले आहेत. या सर्व गोष्टींद्वारे तो असा कोणीतरी होता ज्यावर आपण नेहमी विश्वास ठेवू शकता, जो आपल्या कुटुंबावर प्रेम करतो,''असे पाँटिंग म्हणाला.
तो म्हणाला,''कोणीतरी जो तुम्हाला गरज असेल तेव्हा तुमच्यासाठी तिथे असेल आणि नेहमी त्याच्या मित्राला प्राधान्य देईल. मी सोबत आणि विरोधात खेळलेला तो सर्वोत्तम फिरकीपटू होता. RIP King. कीथ, ब्रिजेट, जेसन, ब्रुक, जॅक्सन आणि समर यांच्यासोबत आहे.''
''सकाळी जेव्हा उठलो तेव्हा ही बातमी मिळाली आणि मला धक्काच बसला. सकाळी मला मुलींना नेटबॉल प्रॅक्टिसला घेऊन जायचेय, हे ठरवून मी झोपी गेलो होतो. पण, सकाळी जे कानावार आले त्याचा सामना करणे अवघड होते आणि मला ते खरं वाटतच नव्हते. आताही हे खरं नाही असंच वाटतंय,''असे पाँटिग म्हणाला.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.