२०२२ च्या अखेरीस दिल्लीहून उत्तराखंडमधील आपल्या घरी जाताना भारताचा स्टार यष्टीरक्षक रिषभ पंत याला गंभीर अपघात झाला होता. त्यानंतर रिषभ पंतवर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पंत पूर्णपणे तंदुरुस्त होऊन क्रिकेटच्या मैदानात कधी पुनरागमन करेल, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे. दरम्यान, आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पॉण्टिंग याने रिषभ पंत आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघासोबत दिसेल, असा दावा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या रिकी पॉण्टिंगने सांगितले की, जर रिषभ पंत स्पर्धेत खेळण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नसेल तरी मी इंडियन प्रीमियर लीगसाठी रिषभ पंतला आपल्यासोबत ठेवणे पसंद करीन.
रिकी पाॉण्टिंगने सांगितले की, तुम्ही अशा खेळाडूंची जागा कुणालाही देऊ शकत नाही, हे स्पष्ट आहे. हे खेळाडू असेच बनत नाहीत. आता आमच्याकडे संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून कोण पर्याय आहेत, हे आम्हाला पाहावे लागेल.
पॉण्टिंग पुढे म्हणाला की, रिषभ पंत प्रत्येक सामन्यामध्ये माझ्यासोबत डग आऊटमध्ये बसावा, अशी माझी अपेक्षा आहे. जक तो खेळण्यासाठी शारीरिकदृष्ट्या फिट नसेल तरीही प्रत्येक सामन्यात त्याल आमच्यासोबत ठेवणे मी पसंद करीन, तो संघाचा उत्तम कर्णधार आहे. कर्णधार असल्याने त्याचं वागणं, हसणं आम्हा सगळ्यांना आवडतं, त्यामुळे जर तो खरोखरच प्रवास करण्यास सक्षम असेल, तर आठवड्यातील प्रत्येक दिवशी त्याने डगआऊटमध्ये माझ्यासोबत बसावं. तसेच आमच्या कॅम्पध्ये बसण्यास जर तो सक्षम असेल तर त्याला मी माझ्यासोबत ठेवेन, असे संकेत रिकी पॉण्टिंग याने दिले आहेत.