अपघातानंतर रिषभ पंत ( Rishabh Pant) पुन्हा एकदा कधी कमबॅक करतोय, याची सर्वांना उत्सुकता आहे. दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग ( Ricky Ponting ) याने मोठे अपडेट्स दिले आहेत. इंडियन प्रीमिअर लीग २०२४ लीगचा पूर्ण हंगाम खेळण्याचा रिषभ पंतला आत्मविश्वास आहे, असे पाँटिंगने सांगितले, परंतु त्याचवेळी तो संघाचे नेतृत्व किंवा यष्टिंमागे संपूर्ण लीगमध्ये उभा राहिल का याबाबत त्याने खात्री व्यक्त केली नाही. डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर रिषभ पंत अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. पण, आधीपेक्षा त्याची प्रकृती बरीच सुधारली आहे.
आयपीएल २०२४च्या हंगामात पंतकडून आम्हाला जे काही योगदान मिळेल ते आमच्यासाठी बोनस असेल, असे पाँटिंग म्हणाला. तो म्हणाला, "आयपीएल २०२४ खेळू, असा विश्वास पंतला आहे, पण तो कोणत्या क्षमतेत खेळेल हे आम्हाला माहीत नाही. तुम्ही सोशल मीडियावरही पाहिले असेल की त्याने सराव सुरू केला आहे आणि तो धावतही आहे. आयपीएलला आता केवळ सहा आठवडे शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे मला माहीत नाही की तो यावर्षी यष्टिरक्षण करू शकेल की नाही. तो एक महान खेळाडू आहे आणि साहजिकच आमचा कर्णधार आहे, गेल्या वर्षीही आम्हाला त्याची उणीव भासली होती."
पॉन्टिंग पुढे म्हणाला, " गेल्या वर्षभरातील त्याचा प्रवास आपण समजू शकतो. तो एक भयंकर अपघात होता. यातून तो वाचला, यासाठी तो तो स्वतःला भाग्यवान समजतो. आम्ही फक्त अशी आशा करतो की, तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन आमच्यासाठी खेळावे. तो १४ पैकी १० सामने खेळला तरी तो आमच्यासाठी बोनस असेल."
जर पंत पूर्णपणे उपलब्ध नसेल तर डेव्हिड वॉर्नर संघाचा कर्णधार असेल हेही पाँटिंगने स्पष्ट केले. या हंगामात त्याच्याकडे मिचेल मार्श, हॅरी ब्रूक आणि वॉर्नरसारखे फलंदाज असल्याने पाँटिंग उत्साहित आहे. मार्श आणि वॉर्नर टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करतील तर ब्रूक मधल्या किंवा खालच्या मधल्या फळीत फलंदाजी करतील आणि फिनिशरची भूमिका बजावतील, असे पॉन्टिंगने सांगितले.