लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘ऋषभ पंत अजूनही खूप युवा आहे. तो कर्णधारपदाचे डावपेच चांगल्याप्रकारे शिकत आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून अजूनही तोच योग्य पर्याय आहे,’ असे सांगत दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने पंतचे समर्थन केले. यंदाच्या आयपीएलमध्ये पंतने मैदानावर घेतलेल्या अनेक निर्णयांवर टीका करण्यात आली. शनिवारीही मुंबई इंडियन्सविरुद्धच्या अत्यंत मोलाच्या सामन्यात त्याच्याकडून काही निर्णय चुकले.
मुंबईविरुद्ध पराभव झाल्यानंतर पाँटिंग म्हणाला की, ‘निश्चितपणे मला कोणतीही शंका नाही की, दिल्लीचा कर्णधार म्हणून पंतच योग्य आहे. गेल्या सत्रातही मला त्याच्या क्षमतेवर शंका नव्हती. पंतने श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर संघाचे कर्णधारपद सांभाळले आणि तेव्हापासून त्याने शानदार कामगिरी केली आहे.’
सामना हातातून जात असल्याचे पाहून निराश झालो, असेही पाँटिंग म्हणाला. मात्र, यासाठी त्याने पंतला जबाबदार धरले नाही. पाँटिंग म्हणाला की, ‘पंत युवा खेळाडू असून, कर्णधारपदाचे डावपेच शिकत आहे. टी-२० संघाचे कर्णधारपद सांभाळणे सोपे नसते. खासकरून आयपीएलसारख्या दबावाच्या स्पर्धेत तुम्ही जो काही निर्णय घेता, त्याचे खोलवर विश्लेषण होत असते. माझा पंतला पूर्ण पाठिंबा आहे. खेळाच्या एका क्षणावर बोट दाखविणे नेहमीच कठीण होते. आमच्या आघाडीच्या फलंदाजांची कामगिरी खराब झाली. आम्ही ४० धावांमध्येच चार महत्त्वाचे फलंदाज गमावले होते.’ मुंबईच्या टीम डेव्हिडच्या खेळीबाबत पाँटिंग म्हणाला की, ‘टीम डेव्हिड नक्कीच खूप चांगला खेळला. तो कदाचित पहिल्याच चेंडूवर परतला असता, पण खेळाचे अनेक पैलू आहेत, ज्यांनी आम्ही निराश झालो. खेळाडूंनी अशा सामन्यातून शिकले पाहिजे.