Ricky Ponting Reaction on Virat Kohli Test Captaincy: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर कसोटी आणि वन डे अशा दोन्ही मालिका गमावल्या. वन डे मालिकेत भारताला ३-० असा पराभव पत्करावा लागला. त्याआधी कसोटी मालिकेत भारत १-० ने आघाडीवर होता, पण पुढचे दोन्ही सामने भारताने गमावले. त्यामुळे भारत कसोटी मालिकेतही २-१ ने पराभूत झाला. या पराभवानंतर तडकाफडकी विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. संपूर्ण क्रिकेट जगतासाठी हा एक मोठा धक्काच होता. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टींगचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती. अनेकांनी धक्क्यामागची वेगवेगळी कारणं सांगितली. त्यामुळे विराटने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यामुळे पॉन्टींगला धक्का का बसला, याचं त्याने कारण सांगितलं.
"विराटने कसोटी कर्णधारपद सोडल्याचं कळलं आणि मला धक्काच बसला. खरं पाहता मला इतका धक्का बसण्याची गरज नव्हती. पण IPL 2021 च्या पूर्वार्धात माझं विराटशी चांगलं नातं निर्माण झालं होतं. त्याच्याशी मी बराच वेळ गप्पा मारत बसायचो. त्यावेळी तो मला वन डे आणि टी२० कर्णधारपद सोडण्याबद्दल बोलला होता. पण त्याच वेळी तो कसोटी कर्णधार म्हणून त्याच्या भारतीय संघासाठी बऱ्याच योजना आहे असंही सांगत होता. असं असताना त्याने राजीनामा द्यावा, याचा मला जास्त धक्का बसला", असं पॉन्टींग म्हणाला.
"विराट तेव्हा माझ्याशी जेव्हा गप्पा मारायचा तेव्हा त्याच्या बोलण्यातून हे स्पष्ट समजत होतं की त्याला संघाचं नेतृत्व करायला खूप आवडतं. भारतीय संघाने त्याच्या नेतृत्वाखाली अनेक पराक्रम गाजवले आहेत. त्यामुळे त्याच्या अशा निर्णयामुळे आश्चर्य वाटणं स्वाभाविकच होतं. मला त्याच्या निर्णयाचा धक्का बसला. पण नंतर मी स्वत:च्या वेळी घेतलेला निर्णय आठवला. त्यामागची कारणंही आठवली. तेव्हा असं वाटलं की आपण योजना केल्यापेक्षा जास्त काळ आपल्याला नेतृत्वाची संधी मिळाली. त्यामुळे अंतिमत: मी अशा निष्कर्षाला पोहोचलो की प्रत्येक आंतरराष्ट्रीय कर्णधाराचा एक ठराविक कालावधी असतो. तो संपला की तुम्ही त्यावरून स्वत: पायउतार होणं अधिक चांगलं", अशी भूमिका पॉन्टींगने मांडली.
"विराटने सुमारे सात वर्ष भारताचं कर्णधारपद भूषवलं. माझ्या मते जगात क्रिकेट संघाचं कर्णधारपद भूषवण्याची सर्वात मोठी जबाबादारी ही भारतातच आहे. कारण या देशातील लोक क्रिकेटचे चाहते आहेत. त्यांना क्रिकेट प्रचंड आवडतं. विराटच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत भारताची देशाबाहेरील विजय मिळवण्याची टक्केवारी वाढली", अशा शब्दात त्याने विराटची स्तुतीदेखील केली.