इंडियन प्रीमिअर लीगचे भारतात पुनरागमन झाले, परंतु पुन्हा एकदा कोरोनाने बायो बबल तोडला. दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील दोन खेळाडूंसह सहा जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे BCCIची चिंता वाढली होती. त्यामुळे दिल्लीचे दोन सामने पुण्यातून थेट मुंबईत हलवण्यात आले. आज रिषभ पंतचा संघ वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा सामना करणार आहे. पण, त्याआधी दिल्ली कॅपिटल्सला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग हे आजच्या सामन्याला उपस्थित राहणार नाहीत ( Delhi Capitals coach Ricky Ponting), त्यांच्या कुटुंबातील सदस्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, परंतु तरीही त्यांनी संघासोबत प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे. तो कुटुंबातील सदस्यासहे टीम हॉटेलमध्येच थांबणार आहे. पाँटिंगच्या अनुपस्थितीत प्रविण आम्रे, अजित आगरकर, जेम्स होप्स आणि शेन वॉटसन हे संघाला मार्गदर्शन करतील.
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात कोणाला झाला कोरोना?
- पॅट्रीक फॅरहॅट- फिजिओथेरपिस्ट ( १५ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
- चेतन कुमार - स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट ( १६ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
- मिचेल मार्श - खेळाडू ( १८ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
- अभिजित साळवी - टीम डॉक्टर ( १८ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
- आकाश माने - सोशल मीडिया कंटेन्ट टीम सदस्य ( १८ एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)
- टीम सेईफर्ट - खेळाडू ( २० एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह)