मुंबई - आॅस्ट्रेलिया आणि त्यांचे खेळाडू आतापर्यंत केवळ स्लेजिंगसाठी ओळखले जायचे. पराभव समोर दिसू लागला किंवा प्रतिस्पर्धी संघातला एखादा खेळाडू जोरदार बॅटिंग करत जेरीस आणू लागला की कांगारू टीममधील खेळाडू स्लेजिंग करायचे. बॅट्समनला डिवचायचे. पण स्टिव्ह स्मिथच्या आॅस्ट्रेलिया संघाने आता नवी ओळख निर्माण केली आहे. बॉल टेम्परिंग करणारा संघ, म्हणून आता त्यांच्याकडे संशयाने बघितले जाईल आणि स्मिथकडे एक ‘बेईमान’ कर्णधार म्हणून...!
गेल्यावर्षी मार्च महिन्यात भारत आणि आॅस्ट्रेलियात बंगळुरूमध्ये कसोटी सामना सुरू होता. त्यावेळीही स्मिथने अशाच प्रकारची बेईमानी करण्याचा प्रयत्न केला होता. मैदानावरील अम्पायरने त्याला आऊट दिल्यानंतर ‘डीआरएस रेफरल’ घ्यावा की नाही यासाठी मैदानाबाहेर पव्हेलियनमध्ये बसलेल्या आपल्या संघातील खेळाडूंची मदत घेण्याचा प्रयत्न केला होता. मैदानातील खेळाडूच अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतात, या नियमाची पायमल्ली त्यावेळी स्मिथने केली होती. त्याचा विराट कोहलीने चांगलाच समाचार घेतला होता.
डेव्हिड वॉर्नरही काही दिवसांपूर्वी एका चाहत्याशी भिडला होता. आउट झाल्यानंतर पव्हेलियनमध्ये परतत असताना त्याची आणि एका प्रेक्षकाची बाचाबाची झाली होती आणि दोघांमधील भांडण मिटवण्यासाठी अखेर सुरक्षा रक्षकाला मधे पडावे लागले होते.