Join us  

Ball tampering: जिंकणं महत्त्वाचं आहेच, पण कसं जिंकता हे जास्त महत्त्वाचं- सचिन तेंडुलकर

यामुळे क्रिकेटची प्रतिष्ठा जपली जाईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:11 AM

Open in App

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेटची प्रतिमा मलीन करणाऱ्या बॉल-टॅम्परिंग प्रकरणावर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने बुधवारी भाष्य केले. सचिनने ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्याने Ball Tampering प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचा कप्तान स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर घालण्यात आलेल्या बंदीचे समर्थन केले. त्याने म्हटले की, क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे. त्यामुळे हा खेळ खेळताना त्याचे पावित्र्य जपले जाणे गरजेचे आहे. जो काही प्रकार घडला तो निश्चित दुर्दैवी होता. परंतु, त्यानंतर घेण्यात आलेले निर्णय हे योग्यच आहेत. यामुळे क्रिकेटची प्रतिष्ठा जपली जाईल. केवळ जिंकणं हेच महत्त्वाचं नसतं, पण कसं जिंकता हे जास्त महत्त्वाचे असते, असे सचिनने म्हटले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी बॉल टॅम्परिंग प्रकरणात डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथवर १२ महिन्यांसाठी बंदी घातली आहे. ही कारवाई अत्यंत कठोर असल्याचे मत व्यक्त होत आहे. वॉर्नर आणि स्मिथला दुसऱ्यांदा संधी द्यावी, अशी विनंती ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी केली आहे. स्मिथ आणि वॉर्नरलाही नेमकी कोणती शिक्षा व्हायला हवी होती, याचा मी अजून विचार करतो. पण एका वर्षाची शिक्षा ही खूप कठोर आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नने व्यक्त केले होते.क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कारवाईनंतर स्मिथ आणि वॉर्नरला इंडियन प्रीमिअर लीगमध्येही खेळता येणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या दोघांना आयपीएलमध्ये खेळण्यापासून मज्जाव केला आहे.

टॅग्स :चेंडूशी छेडछाडसचिन तेंडूलकरक्रिकेट