Rinku Singh, IPL 2023 KKR vs GT: कोलकाता नाइट रायडर्स संघाने रविवारी झालेल्या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या षटकात ५ चेंडूत २८ धावा हव्या असताना KKRचा फलंदाज रिंकू सिंग याने सलग पाच षटकार लगावत सामना जिंकवला. गुजरात टायटन्सच्या यश दयालला त्याने सलग पाच षटकार मारले आणि आपल्या संघाला ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला. या सामन्यात गुजरातने २०४ धावा केल्या होत्या. तसेच, गुजरातचा संघ सामन्याच्या १९व्या षटकापर्यंत आघाडीवर होता, पण एका षटकाने संपूर्ण सामना फिरला आणि त्यामुळे गुजरातच्या संघाचा पराभव झाला. या रोमहर्षक विजयानंतर, KKRचा कर्णधार नितीश राणा भावूक झाल्याचे दिसते. (KKR Captain Nitish Rana Emotional reaction)
"रिंकू सिंग असं काहीतरी करू शकतो असा आम्हाला विश्वास होता. गेल्या वर्षी त्याने असंच केलं होतं, पण आम्हाला विजय मिळवता आला नव्हता. पण आज त्याने जेव्हा दुसरा षटकार मारला त्यानंतर मात्र आम्हाला असं वाटू लागलं की आम्ही जिंकू शकतो. कारण त्याच्या फटकेबाजीमुळे यश दयालला चेंडू नीट टाकता येत नव्हते. राशिद खानने हॅटट्रिक घेत आमच्या संघाला धक्का दिला होता. पण रिंकू सिंगने सामना जिंकवला. मला एक पत्रकार विचारत होता की रिंकू मोठी खेळी का खेळत नाही? आता तुम्हीच विचार करा की जर ही त्याचे सर्वोत्तम खेळी नसेल, तर मग तो जेव्हा सर्वोत्तम खेळेल तेव्हा तो काय धमाल उडवून देईल," असं म्हणत नितीश राणा काहीसा भावूक झाल्याचे दिसला.
गुजरातच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २०४ धावांपर्यंत मजल मारली. सुरूवातील साई सुदर्शनने दमदार अर्धशतक ठोकले. त्याने ३८ चेंडूत ५३ धावा केल्या. दुसरा सलामीवीर शुबमन गिल यानेही ३१ चेंडूत ३९ धावा केल्या. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या विजय शंकरने तुफान धुलाई केली. त्याने २४ चेंडूत नाबाद ६३ धावा कुटल्या आणि संघाला दोनशेपार मजल मारून दिली.
२०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतानात गुजरातच्या संघाची गोलंदाजी खूपच चांगली झाली. पण कोलकाताचा वेंकटेश अय्यर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात आला. त्याने गुजरातच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. त्याने ४० चेंडूत ८३ धावा कुटल्या. त्याला नितीश राणाची चांगली साथ लाभली. राणाने २९ चेंडूत ४५ धावा केल्या. पण नंतर मात्र शेवटच्या षटकात कोलकाताला जिंकण्यासाठी ६ चेंडूत २९ धावा हव्या होत्या. त्यावेळी उमेश यादवने पहिल्या चेंडूवर एक धाव काढली. त्यानंतर पुढील पाचही चेंडूवर षटकार मारत रिंकू सिंगने संघाला विजय मिळवून दिला.