साप बदला घेतो याला शास्त्रज्ञांनी अंधविश्वासच म्हटले आहे. परंतू याबाबतची एक घटना चर्चेत आहे, एका तरुणाला घरे बदलली तरी सापाने सात वेळा चावा घेतला आहे. उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमधील दुबे नावाच्या तरुणासोबत ही घटना घडली आहे. त्याला दरवेळी या धोक्याचा आभास होतो, असा त्याचा दावा आहे. हे झाले सापाचे, परंतू माकडही बदला घेते. विश्वास बसत नसेल तर रिंकू सिंहला विचारा. तोच तो टीम इंडियाचा प्लेअर.
एकाच माकडाने अनेकदा चावा घेतल्याचा प्रकार रिंकूसोबतही घडला आहे. ही गोष्ट कोणी दुसऱ्याने नाहीतर स्वत: रिंकू सिंहने सांगितली आहे. आयपीएल २०२४ नंतर एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने याचा खुलासा केला आहे. अँकरच्या प्रश्नावर रिंकू त्याच्या एका हातावरील टॅटू दाखवितो, तेव्हा अँकर त्याला दुसऱ्या हातावर काय आहे असे विचारतो, तेव्हा रिंकू माकड असल्याचे सांगतो.
हे उत्तर ऐकून रिंकूसोबत त्याचे सहाय्यक प्रशिक्षक असतात ते त्याला त्याची गोष्ट सांगायला सांगतात. तेव्हा रिंकूने आपल्याला एकदा दोनदा नाही तर सहावेळा माकडाने चावले आहे, असे सांगतो. त्याला मी आवडल्याचे रिंकू गंमतीने म्हणाला. मला एकाच माकडाने सहावेळा चावले आहे, असे रिंकूने सांगितले.
विकास दुबेचे काय झाले...विकास दुबेने एकच साप अनेकदा चावल्याचे सांगितले होते. यामुळे सीएमओने याच्या चौकशीचे आदेश दिले होते. यानुसार डॉक्टरांची एक टीम विकासची तपासणी करण्यासाठी गेली. तेव्हा विकासला एकदाच सापाने चावा घेतल्याचे स्पष्ट झाले. याचा रिपोर्ट डॉक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. यामध्ये विकासला स्नेक फोबिया झाल्याचे म्हटले आहे. तसेच मानसिक आजारावरील डॉक्टरांकडून उपचार करून घेण्यासही सांगितले आहे. यानुसार सरकार विकासवर याचे उपचार करणार आहे.