Join us  

रिंकू सिंग अचानक धर्मशाला येथे पोहोचला; पाचव्या कसोटीत पदार्पण की त्यापेक्षा मोठी बातमी?

रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आकाश दिप यांनी या मालिकेतून भारतीय संघात पदार्पण केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 3:05 PM

Open in App

India vs England 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, आकाश दिप यांनी या मालिकेतून भारतीय संघात पदार्पण केले. आता भारताच्या कसोटी संघाचा सदस्य नसतानाही रिंकू सिंग ( Rinku Singh) अचानक धर्मशाला येथे पोहोचला आहे. त्यामुळे तो पाचव्या कसोटीतून पदार्पण करेल का अशी चर्चा सुरू झाली आहे. 

पाचवा सामना खेळण्यासाठी टीम इंडिया ३ मार्चला धर्मशाला पोहोचली होती, ४ मार्चला विश्रांतीचा दिवस होता. यावेळी रिंकूही भारतीय संघासोबत दिसली. अशा स्थितीत तो पाचव्या कसोटीत भारतासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसेल, असा अंदाज चाहते बांधू लागले. पण, बीसीसीआयने धर्मशाला येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या फोटोशूटसाठी संभाव्य खेळाडूंना बोलावले होते, ज्यामध्ये रिंकू सिंगने देखील हजेरी लावली होती. त्यामुळे रिंकू जूनमध्ये होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळताना दिसू शकतो. 

रिंकूने मागच्या वर्षी टीम इंडियाकडून पदार्पण केले आणि त्याने १५ ट्वेंटी-२० व २ वन डे सामन्यांत अनुक्रमे ३५६ व ५५ धावा केल्या आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. BCCI सचिव जय शाह यांनी या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळेल हे आधीच स्पष्ट केले आहे.  टीम इंडिया दोन टप्प्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार असल्याचे मानले जात आहे. आयपीएलमध्ये ज्या खेळाडूंच्या फ्रँचायझी प्ले-ऑफमधून बाहेर पडतील ते खेळाडू प्रथम ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठी अमेरिकेला पोहोचतील. भारताचा पहिला सामना ५ जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे.   

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरिंकू सिंगट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024