Join us  

Asian Games: यशस्वीच्या शतकानंतर रिंकू सिंहची फटकेबाजी, भारताने नेपाळसमोर ठेवले २०३ धावांचे आव्हान 

Asian Games 2023: यशस्वी जयस्वालने केलेल्या शतकी खेळीनंतर अखेरच्या षटकांमध्ये रिंकू सिंहने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर आशियाई क्रीडा स्पर्धेत आज नेपाळविरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने धावांचा डोंगर उभारला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 8:29 AM

Open in App

यशस्वी जयस्वालने केलेल्या शतकी खेळीनंतर अखेरच्या षटकांमध्ये रिंकू सिंहने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर आशियाई क्रीडा स्पर्धेत आज नेपाळविरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने धावांचा डोंगर उभारला. भारताने २० षटकांत ४ बाद २०२ धावा ठोकत नेपाळसमोर २०३ धावांचे आव्हान ठेवले आहे. 

आज भारत आणि नेपाळ यांच्यात रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी भारताला झंझावाती सुरुवात करून दिली. ऋतुराजच्या तुलनेत यशस्वी अधिक आक्रमकपणे फटकेबाजी करत होता.त्याने अवघ्या २२ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. 

अर्धशतक पूर्ण केल्यानंतरही यशस्वीने आक्रमक पवित्रा कायम ठेवला. मात्र दुसरीकडून नेपाळी गोलंदाजांनी भारताला एकामागोमाग एक धक्के दिले. यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी शतकी सलामी दिल्यानंतर नेपाळच्या दीपेंद्र सिंहने ऋतुराजला माघारी धाडले. त्याने २५ धावांचे योगदान दिले. त्यानंतर सोमपाल कामीने तिलक वर्माचा (२ धावा) त्रिफळा उडवत भारताला दुसरा धक्का दिला. तर संदीप लामिचाने याने जितेश शर्माला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद करत भारताला अडचणीत आणले. 

एकीकडून एकेक सहकारी बाद होत असताना यशस्वी जयस्वालने मात्र एक बाजू लावून धरली. त्याने चौकार, षटकारांची बरसात करत अवघ्या ४८ चेंडूतच आपलं शतक पूर्ण केलं. यशस्वीचं टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिलंच शतक ठरलं.

मात्र शतक पूर्ण झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर यशस्वी बाद झाला. त्य़ानंतर शिवम दुबे नाबाद २५ आणि रिंकू सिंह १५ चेंडूत नाबाद ३७ धावा यांनी २२ चेंडूत ५२ धावांची भागीदारी करत भारताला दोनशेपार मजल मारून दिली. नेपाळकडून दीपेंद्र सिंहने २ तर सोमपाल कामी आणि संदीप लामिचाने यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. 

टॅग्स :यशस्वी जैस्वालभारतीय क्रिकेट संघनेपाळआशियाई स्पर्धा २०२३