Rishabh Pant Accident: टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू रिषभ पंत याचा शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला आणि या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडलं. भारतीय क्रिकेट संघाचा हा स्टार फलंदाज-यष्टीरक्षक शुक्रवारी, ३० डिसेंबरच्या सकाळी एका भीषण रस्ते अपघातात जखमी झाला. सदैवाने पंत पेटत्या कारमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. पण पंतला शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आणि दुखापत झाली आहे. या घटनेने एकीकडे सर्वांनाच धक्का बसला होता, याच दरम्यान अशी 'बातमी' आली, जी ऐकून सगळेच संतापले. जखमी रिषभ पंतचे सामान आणि पैसे चोरीला गेल्याची ही 'बातमी' होती. याबाबत काही गोष्टी आता स्पष्ट झाल्या आहेत.
दिल्लीहून रुरकीला जात असताना पंत याची कार दुभाजकावर चढली, अनेक खांबांवर धडकली आणि रस्त्याच्या पलीकडे लांबपर्यंत घासत गेली. पंत कसा तरी स्वत:ला कारमधून बाहेर काढले, त्यानंतर कारने पेट घेतला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही तरुणांनी आणि बसचालकाने त्याला मदत केली. या दरम्यान, त्याला मदत करण्याऐवजी काही तरुणांनी पंतकडील रोकड आणि किमती सामान लुटून तेथून पळ काढल्याचा दावाही करण्यात आला होता. पण पंतच्या सामानाचे नक्की काय झाले? याबाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अशा प्रकारच्या बातम्या समोर येताच साहजिकच घडलेल्या प्रकारावर टीका झाली आणि उत्तराखंड पोलिसांकडून कारवाईची मागणी करण्यात आली. आता उत्तराखंड पोलिसांनी यावर स्पष्टीकरण दिले असून ही पूर्णपणे अफवा आणि खोटी बातमी असल्याचे सांगितले. रिषभ पंतचे सामान त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हरिद्वार पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, घटनेच्या काही क्षणातच घटनास्थळी पोहोचलेले SP देहाट यांनी प्रत्यक्षदर्शी आणि आजूबाजूच्या लोकांकडून संपूर्ण माहिती घेतल्यानंतर असा कोणताही प्रकार समोर आला नसल्याचे सांगितले.
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे की, रुग्णालयात प्राथमिक उपचारा दरम्यान रिषभने मला सांगितले की एक बॅग (सूटकेस) वगळता, वाहनासह सर्व सामान जळाले. पोलिसांच्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, हरिद्वार पोलिसांनी ही सुटकेस आणि घटनास्थळावरून मिळालेली रोख रक्कम, ब्रेसलेट आणि चेन ऋषभ पंतच्या आईला ऋषभच्या समोरील रुग्णालयात सुपूर्द केली.